महामार्गावर ‘लुटीचं’ महाभारत; चिमुकलीला पळवण्याचा प्रयत्न!, साताऱ्यातील शेंद्रेजवळ मध्यरात्री थरारक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 12:12 IST2026-05-12T12:10:01+5:302026-05-12T12:12:22+5:30
पुण्यातील पर्यटकाची कार अडवून लूटमार

महामार्गावर ‘लुटीचं’ महाभारत; चिमुकलीला पळवण्याचा प्रयत्न!, साताऱ्यातील शेंद्रेजवळ मध्यरात्री थरारक घटना
सातारा : पुण्याहून कोकणात कुटुंबासह निघालेल्या पर्यटकांची कार वाटेत दगड टाकून अडवण्यात आली. कारमधील चार जणांना मारहाण करून एका महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावण्यात आले. एवढेच नव्हे तर एका सहा वर्षांच्या चिमुकलीला उचलून घेऊन जाण्याचा धक्कादायक प्रकारही घडल्याचे संबंधित पर्यटकाने व्हिडीओद्वारे आपबिती सांगितली आहे. मात्र, या प्रकरणाची रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
याबाबत मिळालेली माहिती अशी, वाई तालुक्यातील एक कुटुंब अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये वास्तव्यास आहे. उन्हाळी सुट्टी लागल्याने हे कुटुंब कारमधून कोकणात पर्यटनासाठी निघाले होते. कारमध्ये मोठा मुलगा, आई-वडील, पत्नी आणि लहान मुलगी असे पाच जण होते. सोमवारी मध्यरात्री पावणेतीन वाजता या कुटुंबाची कार शेंद्रेजवळ पोहोचली असता, चालकाला वाटेत दगड दिसल्याने कार थांबवली. हीच संधी साधून दहा ते पंधरा जण कारजवळ आले. जबरदस्तीने दरवाजा उघडून कारमधील आई, वडील, पत्नी आणि मोठ्या मुलाला मारहाण केली. तसेच चिमुकल्या मुलीला जबरदस्तीने उचलून घेऊन जात होते.
मात्र, तिच्या आईने तिला घट्ट धरून आरडाओरड केली. त्यामुळे हल्लेखोरांनी मुलीला सोडून देऊन पलायन केले. तर इतर काही चोरट्यांनी आईच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. महामार्गालगत असलेल्या अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले. संबंधित पर्यटकाच्या म्हणण्यानुसार, १५ ते २० जण लुटमारीत सहभागी झाले होते.
तक्रार न देता पर्यटक गेले कोकणात
कारमधील पर्यटक महिलेने अशा अवस्थेतही पोलिस ठाण्यात फोन केला. त्यानंतर काही वेळात पोलिस तेथे पोहोचले. पोलिसांनी तेथील परिसर पिंजून काढला. मात्र कोणीही तेथे सापडले नाही. या प्रकारानंतर संबंधित पर्यटक तेथून कोकणात निघून गेले. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली नसल्यामुळे याप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल केला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाबाबत पोलिस साशंक
या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरलं झाला असून, संबंधित पर्यटकाने आपल्यावर घडलेला प्रसंग कथन केला आहे. परंतु, या प्रकरणाबाबत पोलिस साशंक आहेत. एवढा गंभीर प्रकार घडूनही संबंधित पर्यटक पोलिस ठाण्यात का आले नाहीत, असा प्रश्नही पोलिसांकडून उपस्थित केला जातोय.