राहुल संकपाळ
उमदी : आयुष्यात कोणतं वादळ आलं तर त्यातून सुखरूप सुटका व्हावी म्हणून साकडं घालण्यासाठीच तुझ्याकडे येत असतो अन् तुझ्या डोळ्यादेखत वादळानं संसार उद्ध्वस्त केला. आई मरगूबाई आमचं काय चुकलं ते तर सांगशील का, असा आर्त सवाल दुर्घटनाग्रस्त भाविकांनी साश्रुनयनांनी केल्यानंतर गाव हळहळलं. भिंतीखाली दबलेल्या लोकांचा आक्रोश, किंकाळ्यांनी मोटेवाडीकरही हादरून गेले. निसर्गाची चूक की मानवी चुकांचे भोग, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला.
अवघ्या दोन हजार लोकवस्तीचं मोटेवाडी हे गाव. जत तालुक्यातील या छाेट्या गावात मरगूबाईचं मंदिर तसं प्रसिद्ध. जिल्ह्यासह कर्नाटक सीमाभागातील अनेक भाविक दर आठवड्याला याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. आजचा मंगळवार यात्रेचा मुख्य दिवस होता. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील शेकडो भाविक याठिकाणी आले होते. दुपारी २ वाजेपर्यंत बहुतांश कार्यक्रम पार पडल्यानंतर अनेक भाविक परतले होते. उर्वरित भाविक सायंकाळी जाण्याच्या तयारीत होते.
इतक्यात दुपारी ४ वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग अन् स्थिती पाहूनच संकटाची चाहूल मिळत होती. म्हणूनच भयभीत भाविक मंदिराच्या शेडच्या आसऱ्याला आली. मात्र, वादळाने शेडच्या भिंतीलाच हादरे देत तिला जमीनदोस्त केले. मात्र, भिंतीने भाविकांना चिरडले.
ज्यांच्या घरातील सदस्य मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तिथेच समोर मरगूबाईला हात जोडले. ‘आई आमचं काय चुकलं गं, काय केलंस हे, असा कसा घात झाला’, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. दुपारपर्यंत भक्तीच्या समाधानात अन् यात्रेच्या उत्सवाचा आनंद लुटणाऱ्या अनेक कुटुंबीयांच्या आयुष्यात मंगळवारची सायंकाळ काळरात्र घेऊन आली. कातरवेळी आयुष्यात अंधकार पहावा लागला. त्यांच्या यातना, वेदनांनी गावकऱ्यांचे काळीजही हालले. धीर कसा द्यायचा, याचे उत्तरही कोणाला सापडले नाही. प्रश्नांकित चेहऱ्याने गावकरीही अस्वस्थ झाले होते.
श्रद्धेने उभे केलेले देवघर आज ‘सावध रहा’चा इशारा देतेय
जत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार वादळी वाऱ्याने अक्षरशः थैमान घातले आहे. याचा सर्वात मोठा फटका आता ग्रामीण भागातील जुन्या मंदिरांना बसू लागला आहे. कधी दुष्काळाने होरपळलेला, कधी पाणीटंचाईने त्रस्त झालेला हा तालुका, पण मंदिरं कोसळण्याची भीती प्रथमच ग्रामस्थांच्या मनात घर करत आहे. शेकडो वर्षांची परंपरा जपणारी मंदिरे आज वाऱ्याच्या एका झोताने हादरत आहेत. कुठे कळसांना तडे, कुठे पत्रे उडून गेले, तर कुठे भिंतींना भेगा पडल्याने ग्रामदैवतांच्या आश्रयस्थानालाच धोका निर्माण झाला आहे. श्रद्धेने उभे केलेले हे दगडी देवघर आज मात्र ‘सावध रहा’ असा इशारा देत असल्याचे चित्र आहे.
भक्तिगीतांच्या जागी वेदना अन् आक्रोश
भक्तिगीतांनी निर्माण झालेल्या आध्यात्मिक वातावरणाची जागा आक्रोश अन् किंकाळ्यांनी घेतली. या आवाजाने गाव हादरलं अन् मंदिराच्या दिशेने धावत सुटलं. भिंत पडल्याचे पाहिल्यानंतर अनेकांनी मदतकार्य सुरू केलं; पण क्षणात सहाजणांचा जीव गेला. चिमुकली दोन मुलं, दोन महिला अन् अन्य भाविकांचे मृतदेह काढताना गावकऱ्यांचं काळीज हादरलं.
अशी दुर्घटना कधीही नाही
जत तालुक्यात गावोगावी छोटी-मोठी मंदिरे आहेत, मात्र कधीही मंदिरात असा दुर्घटनेचा प्रसंग तालुक्याने अनुभवला नाही. प्रथमच मोठी दुर्घटना मंदिराच्या आवारात घडली. त्यामुळे मंदिर परिसरातील इमारती व शेडच्या सुरक्षेचा प्रश्न आता चव्हाट्यावर आला आहे.
मोठ्या देवस्थानांना निधी, मग गावातील मंदिरं का वाऱ्यावर?
राज्यात मोठ्या देवस्थानांच्या नावाने कोट्यवधींची कामं, गाजावाजा, आरती-उत्सवांचा थाट… पण गावागावांत उभ्या असलेल्या जुन्या मंदिरांकडे मात्र डोळेझाक का? हा सवाल आता ग्रामस्थ उघडपणे विचारू लागले आहेत.
वेश, जुनी मंदिरे… दुर्लक्षाचा बळी!
फक्त मंदिरंच नाही, तर गावातील जुन्या वेशींनाही याच दुर्लक्षाची झळ बसत आहे. इतिहास सांगणाऱ्या या वास्तू आज वाऱ्याच्या तडाख्याने ढासळत असताना, ‘संरक्षण द्या’ अशी मागणी जोर धरू लागली आहे.
निधीचा अन् सुरक्षेचा प्रश्न सोडवायचा कुणी
श्रद्धा मोठ्या देवळांपुरतीच आहे का? आमच्या गावच्या देवांना, आमच्या परंपरांना काही किंमत नाही का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. निधी नसल्याने आपापल्या परीने मंदिराची डागडुजी अन् भाविकांसाठी गावागावांत सुविधा उभारल्या जात आहेत. मात्र, या दुर्घटनेने आता सुविधांच्या मजबुतीचा प्रश्न निर्माण केला आहे.
Web Summary : A storm caused a temple wall to collapse in Motewadi, Sangli, killing six devotees. Villagers question the safety of old temples and demand funds for repairs after the tragic incident, highlighting infrastructure concerns.
Web Summary : सांगली के मोटेवाड़ी में तूफान से मंदिर की दीवार गिरने से छह श्रद्धालुओं की मौत हो गई। ग्रामीणों ने पुरानी मंदिरों की सुरक्षा पर सवाल उठाए और दुखद घटना के बाद मरम्मत के लिए धन की मांग की, बुनियादी ढांचे की चिंताओं पर प्रकाश डाला।