Sangli Crime: गलाई व्यावसायिकाचे दोन कोटींचे सोने घेऊन कामगाराचे पलायन, साताऱ्यातील तरुणावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 12:54 IST2026-05-19T12:53:27+5:302026-05-19T12:54:19+5:30
बामणी येथील मुलाणी यांचे उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे सोने-चांदीचे गलाई दुकान आहे

संग्रहित छाया
विटा : उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे स्थायिक असलेल्या बामणी (ता. खानापूर) येथील गलाई व्यावसायिकाचे त्यांच्याच दुकानात काम करणाऱ्या कामगाराने १ किलो ५६४ ग्रॅम वजनाचे सुमारे एक कोटी ९५ लाख रुपये किमतीचे चोख सोने घेऊन पलायन केले. याप्रकरणी पृथ्वीराज भीमराव साळुंखे (वय २६, रा. कोडोली, ता. जि. सातारा) या कामगाराविरुद्ध विटा पोलिसांत रविवारी, दि. १७ मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
बामणी येथील परवीन व त्यांचे पती बशीर मुलाणी यांचे उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे सोने-चांदीचे गलाई दुकान आहे. पती-पत्नी गावाकडे आल्यानंतर हा व्यवसाय त्यांची मुले जुबेर व वसीम चालवितात. दुकानात काम जास्त असल्याने बशीर यांनी मदतीसाठी मंगरूळ (चिंचणी) येथील रोहित फडतरे यांच्या मध्यस्थीने पृथ्वीराज साळुंखे यास मागील वर्षापासून मुरादाबाद येथील मुलाणी याच्या दुकानात कामावर ठेवले होते.
बशीर मुलाणी हे आजारी असल्याने जुबेर व वसीम या दोन्ही मुलांना आईने गावाकडे बोलावून घेतले. त्यावेळी जुबेर यांनी मुरादाबादच्या दुकानात तीन सराफांचे शुद्धीकरण केलेले १ किलो ५६४ ग्रॅम वजनाचे सोने गावी येताना सोबत आणले होते. परंतु, परत दुकानाकडे जाताना ते सोने बामणी येथील घरी राहिले होते.
त्यानंतर त्यांच्या दुकानात काम करणारा पृथ्वीराज साळुंखे हा कामगारही गावाकडे आला होता. त्यावेळी जुबेर यांनी फोन करून आईला पृथ्वीराज याच्याजवळ १ किलो ५६४ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन लगड द्या, असे सांगितले. २५ फेब्रुवारी रोजी पृथ्वीराज यांच्याकडे त्यांनी १ कोटी ९५ लाख रुपये किमतीचे १ किलो ५६४ ग्रॅम वजनाचे चोख सोने दिले.
परंतु, पृथ्वीराज साळुंखे हे सोने घेऊन दुकानाकडे गेलाच नाही. बशीर हे त्याच्या कोडोली गावी जाऊन आले. परंतु, तेथेही तो सापडला नाही. दरम्यान, दि. ८ मे रोजी बशीर मुलाणी यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर दि. १७ मे रोजी त्यांची पत्नी परवीन मुलाणी यांनी विटा पोलिसांत पृथ्वीराज साळुंखे या कामगाराविरुद्ध १ कोटी ९५ लाख रुपयांचे सोने घेऊन पलायन करीत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.