शेतात काम करत असताना अचानक उष्माघाताचा त्रास; खुरपणी करताना महिला शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 17:00 IST2026-04-27T17:00:02+5:302026-04-27T17:00:47+5:30
सकाळी ११ सुमारास उन्हाची तीव्रता अधिक असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले, उष्माघाताचा तीव्र झटका बसल्याने त्या जागीच कोसळल्या

शेतात काम करत असताना अचानक उष्माघाताचा त्रास; खुरपणी करताना महिला शेतकऱ्याचा मृत्यू
वडगाव आनंद : सध्या संपूर्ण जुन्नर तालुक्यात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून, या वाढत्या उष्णतेचा एक भीषण बळी निमगाव सावा येथे गेला आहे. शेतात काम करत असताना अचानक उष्माघाताचा त्रास झाल्याने सौ. रुपाली भाऊ गाडगे (वय अंदाजे ४०) या महिला शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे निमगाव सावा गावासह संपूर्ण परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निमगाव सावा येथील गावमाळा/माडीमळा परिसरातील रहिवासी असलेल्या सौ. रुपाली गाडगे या आज, सोमवार दि. २७ एप्रिल रोजी सकाळी आपल्या शेतात खुरपणीचे काम करत होत्या. सकाळी ११:४५ च्या सुमारास उन्हाची तीव्रता अधिक असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. उष्माघाताचा तीव्र झटका बसल्याने त्या जागीच कोसळल्या. त्यांना तातडीने मदत मिळेपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. एका कष्टकरी माऊलीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने गाडगे कुटुंबावर डोंगर कोसळला आहे.
मृत रुपाली गाडगे यांच्या पश्चात पती, मुले आणि मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी ५:३० वाजता निमगाव सावा येथील कुकडी नदी तीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या तापमानामुळे विशेषतः शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत कष्टाची कामे टाळावीत. कामाच्या ठिकाणी सोबत पाणी, लिंबू सरबत किंवा ताक ठेवावे आणि डोक्याला रुमाल किंवा टोपीचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.