पुण्यातील प्रदूषण अजून वाढणार? आरएमसी प्लांट शहराच्या हद्दीबाहेर जाणार नाही, असोसिएशनची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 11:32 IST2026-05-09T11:31:58+5:302026-05-09T11:32:06+5:30
नव्याने कामकाज सुरू करताना प्रत्येक आरएमसी प्रकल्पाकडून सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, असे हमीपत्र असोसिएशनकडून लिहून घेतले जाणार आहे

पुण्यातील प्रदूषण अजून वाढणार? आरएमसी प्लांट शहराच्या हद्दीबाहेर जाणार नाही, असोसिएशनची भूमिका
पुणे : शहरातील रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्प येत्या सहा महिन्यांत शहरातून हद्दपार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता; पण हे प्रकल्प सध्याच्याच जागेवर राहणार असून, प्रशासनाने आखून दिलेल्या नव्या नियमावलीनुसार (एसओपी) शनिवारपासून (दि.९) त्यांचे कामकाज सुरू होणार आहे. मात्र, हे प्रकल्प शहरातून बाहेर घेऊन जाणार नाही, अशी भूमिका पुणे आरएमसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर आणि सचिव सचिन काटे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. दरम्यान, जिल्हाधिकारी आणि पालिका प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुण्यात आरएमसी प्लांट्समुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नाका-तोंडात धूळ जाऊन गंभीर आजार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविला होता. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली होती. त्या बैठकीत शहरातील आरएमसी प्रकल्प येत्या सहा महिन्यांत शहरातून हद्दपार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे जाहीर केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे आरएमसी असोसिएशन भूमिका स्पष्ट केली. ‘आरएमसी प्रकल्प आता बुधवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवशी हे प्रकल्प सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील. तर सोमवार, मंगळवार, गुरुवार व शुक्रवार या चार दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी पाच यादरम्यानच प्रकल्प सुरू ठेवता येणार आहेत. आरएमसी प्रकल्पांना पर्यावरणाच्या नियमाची पूर्तता करण्यासाठी आता ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत ज्यांनी नियमांची पूर्तता केली नाही, असे प्रकल्प थेट बंद करण्यासाठी असोसिएशनतर्फेच प्रयत्न केले जातील. तसेच, नव्याने कामकाज सुरू करताना प्रत्येक आरएमसी प्रकल्पाकडून सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, असे हमीपत्र असोसिएशनकडून लिहून घेतले जाणार आहे, असे पुणे आरएमसी असोसिएशनचे सचिव सचिन काटे यांनी सांगितले.
‘टोल-फ्री हेल्पलाइन’ सुरू करणार
आरएमसी प्रकल्प शहरातच राहणार असून, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष 'टोल-फ्री हेल्पलाइन' सुरू केली जाणार आहे. ट्रान्झिट मिक्सरची बेदरकार वाहतूक किंवा प्रदूषण होत असल्यास नागरिक थेट तक्रार करता येणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांत ही ‘टोल-फ्री हेल्पलाइन’ सुरू केली जाणार आहे.