Pune Rain: मागील वर्षीच्या आश्वासनांचं काय? एकतानगरीत पुन्हा पाणी शिरले, नागरिकांचा तीव्र संताप, रेस्क्यू ऑपरेशन सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 10:19 IST2025-08-20T10:17:37+5:302025-08-20T10:19:12+5:30

उद्यापासून नेतेमंडळी येतील, पाहणी करतील अन् पुन्हा आश्वासनांची खैरात करतील, नागरिक संतापले

What about last year's promises? Water enters Ektanagari again, citizens are furious, rescue operation begins | Pune Rain: मागील वर्षीच्या आश्वासनांचं काय? एकतानगरीत पुन्हा पाणी शिरले, नागरिकांचा तीव्र संताप, रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Pune Rain: मागील वर्षीच्या आश्वासनांचं काय? एकतानगरीत पुन्हा पाणी शिरले, नागरिकांचा तीव्र संताप, रेस्क्यू ऑपरेशन सुरु

पुणे : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने सिंहगड रस्ता परिसरातील एकतानगरी भागातील इमारतींच्या पार्किंगमध्ये तसेच रस्त्यावर बॅक वॉटरचे पाणी साचले. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास धरणाच्या सांडव्यावरील विसर्ग २९,०८४ क्युसेकवरून थेट ३५,३१० क्युसेक करण्यात आल्याने, नदीकाठच्या रहिवासी भागांना मोठा फटका बसला आहे. या वाढीव विसर्गामुळे एकतानगरीसारख्या सोसायटी आणि इमारतींच्या पार्किंगमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. अचानक वाढलेल्या विसर्गामुळे नदीपात्राबाहेर पाणी आले आणि सखल भागातील इमारतींच्या तळमजल्यावर पाणी जमा झाले. गेल्या वर्षी याच एकता नगरीच्या विविध अपार्टमेंटमध्ये पाणी छातीपर्यंत पाणी शिरल्याने हाहाकार उडाला होता. मात्र नागरिक आता संताप व्यक्त केला आहे. उद्यापासून नेतेमंडळी येतील, पाहणी करतील अन् पुन्हा आश्वासनांची खैरात करतील असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

आता त्याठिकाणी पुणे महानगरपालिकेकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले आहे. लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आता खडकवासला धरणातून ३९, १३८ क्युसेक करण्यात येणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेने दिली आहे. गेल्या वर्षी आलेल्या पुराच्या पार्श्वभुमीवर पुणे महानगरपालिकेने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन दल आणि इतर संबंधित विभागांना सज्ज ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीकाठच्या भागात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातील पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, अचानक मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवल्याने पाणी शिरण्याचा हा प्रकार घडला आहे. पुढील काही तास पाण्याची पातळी अशीच राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

 रस्त्यावर अन् इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी; रहिवाशांची नाराजी..

दरवर्षी आमच्या भागातील इमारतीमध्ये पाणी शिरते. अनेकांचे लाखोंचे नुकसान होते. नेतेमंडळी येतात आश्वासनाची खैरात करून जातात. मात्र, पुढे काहीच घडत नाही. आता आज येथील रस्त्यांवर व इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले आहे. उद्यापासून नेतेमंडळी येतील, पाहणी करतील अन् पुन्हा आश्वासनांची खैरात करतील, मात्र आत्तापर्यंत कोणत्याच उपाययोजना केल्या नसल्याबाबत येथील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: What about last year's promises? Water enters Ektanagari again, citizens are furious, rescue operation begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.