भिगवण: खडकवासला धरणातून इंदापूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी तसेच कळस, तरंगवाडी, भादलवाडी आदी तलावात शेतीसाठी तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी आज सोमवारी (दि,१८) रोजी संतप्त शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. कार्यकारी अभियंता देशमुख यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची मुदत उलटूनही पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचा रोष अनावर झाला होता. अखेर, जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आजच तातडीची बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
खडकवासला कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील शेती पिके पाण्याचा अभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देशमुख यांनी गेल्या १२ तारखेला शेतकऱ्यांना लेखी आश्वासन देऊन पाणी सोडण्याचे कबूल केले होते. मात्र, आज १८ तारीख उजाडली तरी तलावात पाण्याचा थेंबही न पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला. प्रशासनाच्या या दिरंगाईचा निषेध करत आज शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पुणे-सोलापूर महामार्ग रोखून धरला.
महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली होती. "पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे," अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी सरकार आणि पाटबंधारे विभागाचा तीव्र निषेध केला. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहता परिस्थिती तणावपूर्ण बनली होती.
प्रशासनाकडून तातडीच्या बैठकीचे आश्वासन
शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले. जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. खडकवासला धरणातून पाणी सोडण्याच्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणींवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी आजच जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी, इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि संबंधित मंत्री यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक आयोजित करण्यात येईल, असे ठोस आश्वासन प्रशासनाने दिले. प्रशासनाने १२ तारखेला दिलेले लेखी आश्वासन पाळले नाही, हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. आज जर बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही आणि तरंगवाडी तलावात पाणी सुटले नाही, तर यापुढील आंदोलन अधिक तीव्र आणि उग्र असेल,"
आंदोलन स्थगित
जिल्हाधिकाऱ्यांनी आजच्या आजच वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन पाणीप्रश्नी तात्काळ मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनावर विश्वास ठेवत आपले ‘रास्ता रोको’ आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, पाणी मिळेपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशाराही शेतकऱ्यांनी या वेळी दिला. या आंदोलनामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
Web Summary : Indapur farmers blocked the Pune-Solapur highway, demanding immediate water release from Khadakwasla Dam for irrigation. Assurances from officials proved empty, prompting protests. Authorities pledged an urgent meeting to resolve the water crisis, temporarily halting the agitation.
Web Summary : इंदापुर के किसानों ने सिंचाई के लिए खडकवासला बांध से तत्काल पानी छोड़ने की मांग करते हुए पुणे-सोलापुर राजमार्ग को अवरुद्ध कर दिया। अधिकारियों के आश्वासन खाली साबित हुए, जिससे विरोध प्रदर्शन हुआ। अधिकारियों ने जल संकट को हल करने के लिए तत्काल बैठक का वादा किया, जिससे आंदोलन अस्थायी रूप से रुक गया।