Pakistan on US Iran War: पाकिस्तानने सोमवारी संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील बरका अणुऊर्जा प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा (Drone Attack on UAE Nuclear Plant) निषेध केला. पाकिस्तानने म्हटले की, अणुऊर्जा प्रकल्पांना जाणीवपूर्वक लक्ष्य करणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे आणि अशी बेजबाबदार कृती मानवी जीवनासाठी विनाशकारी ठरू शकतात. अशा परिस्थितीत विनाश अटळ आहे, अशी भीती पाकिस्तानने बोलून दाखवली.
UAE वरील हल्ला युद्धास कारण ठरणार?
अमेरिका-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने आखाती देशांवर, विशेषतः UAE वर मोठे हल्ले केले आहेत आणि हा हल्ला याच संघर्षाशी संबंधित असल्याचे मानले जात आहे. अमेरिका-इराण संघर्ष संपवण्यासाठी पाकिस्तानने मध्यस्थीची भूमिका बजावली आहे. दोन्ही बाजूंमध्ये एक अत्यंत नाजूक शस्त्रसंधी अस्तित्वात आहे, जी या हल्ल्यामुळे आणखी ताणली गेली आहे.
कोणत्याही परिस्थितीत अणुऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करू नये!
पाकिस्तानने UAE वरील हल्ल्याचा निषेध केला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, "UAE च्या बंधुत्वपूर्ण जनता आणि सरकारसोबत पाकिस्तान पूर्णपणे एकजुटीने उभा आहे. अणुऊर्जा प्रकल्पांना जाणीवपूर्वक लक्ष्य करणे हे आंतरराष्ट्रीय कायदा, संयुक्त राष्ट्रसंघाची सनद आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) नियमावली व ठरावांमध्ये नमूद केलेल्या अणुसुरक्षा आणि संरक्षणाच्या मूलभूत तत्त्वांचे गंभीर उल्लंघन आहे. कोणत्याही परिस्थितीत अणुऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करू नये. अशा बेपर्वा कृती मानवी जीवन, पर्यावरण, प्रादेशिक आणि जागतिक शांतता व सुरक्षेसाठी विनाशकारी आहेत आणि त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात."
संवाद हाच एकमेव मार्ग
"नागरी अणुऊर्जा पायाभूत सुविधांची सुरक्षा हा एक प्रस्थापित आंतरराष्ट्रीय मापदंड आहे, ज्याचे उल्लंघन न करता पालन केले पाहिजे. सर्व देशांनी 'कमाल संयम' राखला पाहिजे. सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय कायदा आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यानुसार आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्यांनी अशा कृती टाळाव्यात ज्यामुळे तणाव आणखी वाढू शकतो. याचे परिणाम ठराविक प्रदेशाच्या पलीकडेही पोहोचू शकतात. प्रदेशात शांतता, स्थैर्य आणण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव व्यवहार्य मार्ग आहे." असेही या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) एका अणुऊर्जा प्रकल्पावर काल ड्रोन हल्ला करण्यात आला होता. बरका अणुऊर्जा प्रकल्पाच्या अंतर्गत सुरक्षा परिघाबाहेरील एका विद्युत जनरेटरवर ड्रोन हल्ला झाला होता. त्यामुळे आग लागली. किरणोत्सर्गी सुरक्षा उपायांवर परिणाम झाला नाही आणि कोणतीही इजा झाल्याचे वृत्त नाही.
Web Summary : Pakistan condemned the attack on the UAE nuclear plant, calling it a violation of international law. They warned of catastrophic consequences for human life and global security, urging dialogue and restraint to prevent further escalation in the region.
Web Summary : पाकिस्तान ने यूएई परमाणु संयंत्र पर हमले की निंदा की, इसे अंतरराष्ट्रीय कानून का उल्लंघन बताया। उन्होंने मानव जीवन और वैश्विक सुरक्षा के लिए विनाशकारी परिणामों की चेतावनी दी, और क्षेत्र में आगे बढ़ने से रोकने के लिए बातचीत और संयम का आग्रह किया।