नगरसेवक निवडून येण्यामागे विकासाचे गमक नाही; पुण्यातही ठेकेदार, खंडणी कोट्यवधींच्या पैशाचे राजकारण - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 20:34 IST2026-04-29T20:33:08+5:302026-04-29T20:34:56+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही काळापूर्वी एक विधान केले होते की, महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती राहील. त्या गर्जनेचे काय झाले?

There is no development motive behind getting corporator elected; Even in Pune, politics of contractors, extortion worth crores - Sanjay Raut | नगरसेवक निवडून येण्यामागे विकासाचे गमक नाही; पुण्यातही ठेकेदार, खंडणी कोट्यवधींच्या पैशाचे राजकारण - संजय राऊत

नगरसेवक निवडून येण्यामागे विकासाचे गमक नाही; पुण्यातही ठेकेदार, खंडणी कोट्यवधींच्या पैशाचे राजकारण - संजय राऊत

पुणे: पुणे महापालिकेत भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येण्यामागे कोणतेही विकासाचे गमक नाही, पुण्यातही काळा पैसा, ठेकेदार, खंडणीचा कोट्यवधींच्या पैशाचे राजकारण असल्याची टिका उध्दवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. पुणे महापालिकेत भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येण्यासाठी भाजपने काय तीर मारला ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पुणे महापालिकेतील उध्दवसेनेच्या पक्ष कार्यालयाला खासदार संजय राऊत यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, गटनेते नितीन गावडे, वसंत मोरे, संजय मोरे, गजानन थरकुडे, प्रशांत बधे उपस्थित होते. त्यावेळी राउत बाेलत होते.

महापौर बंगल्यातील २० झाडांची कत्तलीवर खासदार संजय राऊत म्हणाले, झाडांची कत्तल हा फक्त पुण्याचा विषय नाही, तर हा संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचा विषय आहे.  मुंबईतील आरेचे जंगल, ज्याला मुंबईचे फुफ्फुस म्हटले जाते, तिथे मेट्रोच्या नावाखाली एका रात्रीत २४०० झाडे तोडली गेली. उध्दवसेनेनेआंदोलन केले, युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आंदोलन केले, पण काय झाले? नाशिकच्या तपोवनात कुंभाच्या नावाखाली झाडे तोडली गेली. जोपर्यंत नागरिक जागृत होत नाहीत, तोपर्यंत सत्ताधार्यांची ही भूमिका अशीच राहील.

खासदार संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही काळापूर्वी एक विधान केले होते की, महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती राहील. तेव्हा आम्ही टाळ्या वाजवल्या होत्या. मग आता त्या गर्जनेचे काय झाले? महाराष्ट्राच्या राजधानीत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी यावे, ही भूमिका अतिरेक कशी असू शकते? मुंबईत मराठी बोलणे हा अतिरेक वाटत असेल, तर हे सरकार मराठीच्या संवर्धनासाठी गंभीर नाही. त्यांना मुंबई केंद्रशासित करायची आहे, त्या दिशेने पडलेली ही पावले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याची त्यांची लायकी नाही

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भगतसिंह कोश्यारींपासून ते बागेश्वर बाबांपर्यंत अनेकजण वादग्रस्त विधाने करत आहेत यावर खासदार संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ही लोकं जी विधाने करतात, त्याचे समर्थन मुख्यमंत्री करतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. शिवाजी महाराज हे राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक आहेत. महाराजांचे नाव घेण्याची तुमची लायकी नाही, असा घाणाघात त्यांनी केला.

Web Title: There is no development motive behind getting corporator elected; Even in Pune, politics of contractors, extortion worth crores - Sanjay Raut