मुंबईतील वानखेडेच्या मैदानात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने IPL कारकिर्दीतील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत करून दाखवले. या विजयासह सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्ससाठी ८ सामन्यातील ६ व्या पराभवासह प्लेऑप्सचा मार्ग खडतर झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्यांदा फलंदाजी करताना रायन रिकल्टनच्या विक्रमी शतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात २४३ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्मानं सनरायझर्स हैदराबादला धमाकेदार सुरुवात करून दिली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ५२ चेंडूत १२९ धावांची खेळी करत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. ही जोडी माघारी फिरल्यावर हेन्री क्लासेन याने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीतील क्लास दाखवत संघाचा विजय निश्चित करणारी आश्वासक खेळी केली. धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून अल्लाह गझनफर वगळता अन्य कोणत्याही गोलंदाजाला छाप सोडता आली नाही. परिणामी रायन रिकल्टनच्या विक्रमी शतकी खेळी व्यर्थ ठरली.
MI च्या सलामीच्या नव्या प्रयोगात ‘विल पॉवर’ दिसली; पण सूर्यकुमार यादव पुन्हा फेल
रायन रिकल्टनची विक्रमी सेंच्युरी
मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात नाणेफेक जिंकून हार्दिक पांड्याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नव्या सलामी जोडीचा प्रयोगही यशश्वी ठरला. रायन रिकल्टन आणि विल जॅक्स जोडीनं पहिल्या विकेटसाठी ४३ चेंडूत ९३ धावांची भागीदारी रचत संघाला दमदार सुरुवात करून दिली. विल जॅक्स २२ चेंडूत ४६ धावांची खेळी करून परतल्यावर मैदानात उतरलेला सूर्यकुमार यादव पुन्हा अपयशी ठरला. त्याने ५ धावांची भर घालून तंबूचा रस्ता धरला. नमन धीरनं १७ चेंडूत २२ तर कर्णधार हार्दिक पांड्या १५ चेंडूत ३१ धावा करून माघारी फिरल्यावर रायन रिकल्टन याने शेवटपर्यंत मैदानात थांबत ५५ चेंडूत १० चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने २२३ च्या स्ट्राईक रेटसह १२३ धावा करत संघाच्या धावफलकावर ५ विकेट्सच्या मोबदल्यात २४३ धावा लावल्या. सनरायझर्स हैदराबादकडून गोलंदाजीत प्रफुल हिंगे याने सर्वाधिक २ तर एशान मलिंगा, साकीब हुसेन आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.
अभिषेक-ट्रॅविस हेडचा धमाका, अखेरच्या षटकात क्लासेनचा क्लास पुन्हा दिसला
धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेड यांनी संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. मुंबई इंडियन्सच्या सलामी जोडीपेक्षा धमाकेदार खेळी करत या जोडीनं पहिल्या ९ षटकातच सामन्यावर मजबूत पकड बनवली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी रचली. अभिषेक शर्मा २४ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४६ धावा करून परतल्यावर यंदाच्या हंगामात धावांसाठी संघर्ष करणाऱ्या ट्रॅविस हेडनं या सामन्यात ३० चेंडूत ४ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ७६ धावांची खेळी साकारली. नमन धीरनं त्याला बाद करण्याच्या तीन संधी गमावल्या याची किंमत मुंबई इंडियन्सला पराभवासह मोजावी लागली. क्लासेन याने ३० चेंडूत नाबाद ६५ धावा केल्या तर अखेरच्या षटकात सलिल अरोरा याने १० चेंडूत ३०० च्या स्ट्राईक रेटनं नाबाद ३० धावा कुटल्या. मुंबई इंडियन्सकडून अल्लाह गझनफर याने सर्वाधिक २ तर हार्दिक पांड्या आणि ट्रेंट बोल्ड याने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. बुमराह विकेट लेस राहिला हे देखील MI च्या पराभवाचं एक कारण ठरलं.