तांदूळ, प्राण्यांच्या खाद्यपदार्थ निर्यातीचे आमिष; दोघांची तब्बल ४ कोटी ३३ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 16:32 IST2026-05-13T16:32:02+5:302026-05-13T16:32:12+5:30

पैसे घेतल्यानंतर त्यांना परतावा दिला नाही, तसेच व्यावसायिकाने पैसे परत मागितल्यानंतर टाळाटाळ सुरू केल्यावर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले

The lure of exporting rice and animal feed Two people cheated of Rs 4 crore 33 lakh | तांदूळ, प्राण्यांच्या खाद्यपदार्थ निर्यातीचे आमिष; दोघांची तब्बल ४ कोटी ३३ लाखांची फसवणूक

तांदूळ, प्राण्यांच्या खाद्यपदार्थ निर्यातीचे आमिष; दोघांची तब्बल ४ कोटी ३३ लाखांची फसवणूक

पुणे : परदेशात बासमती तांदूळ, तसेच प्राण्यांसाठी खाद्यपदार्थ निर्यात करण्याचे आमिष दाखवून चार कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी मनीष रमणलाल गांधी (वय ५०, रा. ५०२, सोजस सार्थक अपार्टमेंट, अभिनव शाळेजवळ, एरंडवणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुंबईतील एका व्यावसायिकाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मुंबईतील चारकोप परिसरात राहायला आहेत. त्यांची आरोपी गांधी याच्याशी ओळख झाली होती. आरोपीने त्यांना बासमती तांदूळ निर्यात व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले होते. त्यांच्याकडून वेळोवेळी परदेशी चलन, तसेच भारतीय चलनात वेळोवेळी दोन कोटी आठ लाख ११ हजार घेतले. पैसे घेतल्यानंतर त्यांना परतावा दिला नाही, तसेच व्यावसायिकाने पैसे परत मागितल्यानंतर टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करत आहेत.

आरोपीने अशाच पद्धतीने एका वकिलाची दोन कोटी २४ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. तक्रारदार वकील हे सहकारनगर भागात राहायला आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीविरोधात आणखी एक गुन्हा डेक्कन पोलिसांनी दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थायलंडमधील एका कंपनीला ॲनिमल काॅर्न फूड पाठवायचे आहे. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून आरोपी गांधी याने त्यांची फसवणूक केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत. 

Web Title: The lure of exporting rice and animal feed Two people cheated of Rs 4 crore 33 lakh