घरात कोणी नसल्याची संधी साधून मुलीवर अत्याचार; नराधम बापाला जन्मठेप, जुन्नर कोर्टाचा कठोर निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 12:46 IST2026-05-09T12:45:59+5:302026-05-09T12:46:31+5:30
शाळेच्या मधल्या सुट्टीत ९ वर्षीय मुलगी जेवणासाठी घरी आली असता घरात कोणी नसल्याची संधी साधून तिच्या वडिलांनी घराचा दरवाजा बंद करून मुलीला मारहाण केली व तिच्यावर अत्याचार केला.

घरात कोणी नसल्याची संधी साधून मुलीवर अत्याचार; नराधम बापाला जन्मठेप, जुन्नर कोर्टाचा कठोर निर्णय
ओतूर : स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी बापाला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय जुन्नर यांनी कठोर निर्णय सुनावत जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.
ओतूर पोलिस स्टेशन हद्दीत १९ डिसेंबर २०२० रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. शाळेच्या मधल्या सुट्टीत ९ वर्षीय मुलगी जेवणासाठी घरी आली असता घरात कोणी नसल्याची संधी साधून तिच्या वडिलांनी घराचा दरवाजा बंद करून मुलीला मारहाण केली व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार मुलीच्या आईच्या निदर्शनास आल्यानंतर तिने तत्काळ ओतूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी राजेश रामदास नवले याच्याविरुद्ध बलात्कार, मारहाण तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन प्रभारी पोलिस निरीक्षक पी. एच. कांबळे यांनी तपास स्वतःकडे घेत आरोपीला अटक केली. तपासादरम्यान आरोपीविरोधात सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष न्यायाधीश एस. बी. शेलार यांनी आरोपीला पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवत जन्मठेपेची सक्त शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच भादंवि कलम ३२३ अंतर्गत एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे.