Baramati Bypoll Election: सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत सकाळपासून मतदानाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 10:05 IST2026-04-23T10:03:15+5:302026-04-23T10:05:10+5:30
Baramati Bypoll Election सर्व नागरिकांनी जबाबदारीची जाणीव ठेवून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले

Baramati Bypoll Election: सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत सकाळपासून मतदानाला सुरुवात
बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली आहे. आवश्यक मतदान साहित्य आणि कर्मचारी आज संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले आहे. एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामातून ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.
आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी खासदार पार्थ अजित पवार आणि जय अजित पवार यांनी याच ठिकाणी मतदान करत लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवला. याप्रसंगी सर्व नागरिकांनी जबाबदारीची जाणीव ठेवून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकुटुंब मतदान केले. दादांना जाऊन ३ महिने सुद्धा झाले नाहीत. आज आम्ही कर्तव्य बजावण्यासाठी आलो आहोत. दादांना आदरांजली वाहण्यासाठी आज मतदानासाठी यावं मोठ्या संख्येने लोकांनी मतदान करावं असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले.
मतदानासाठी ४७८ मतदान केंद्रांसाठी ४७८ ईव्हीएम, ९५६ बॅलेट युनिट्स आणि ४७८ व्हीव्हीपॅट यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही सर्व यंत्रे ६० बंदिस्त मिनी टेम्पोंद्वारे क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे मतदान केंद्रांवर पोहोचवण्यात आली. यंदा निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वितरण प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. मतदान पथकांना डिस्पॅच सेंटरवर न बोलावता थेट संबंधित मतदान केंद्रांवर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ईव्हीएम यंत्रांसह आवश्यक फॉर्म्स, लिफाफे व इतर साहित्य थेट केंद्रांवर पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे यांनी दिली.