उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 22:35 IST2026-04-19T22:35:05+5:302026-04-19T22:35:58+5:30
उरुळी कांचन परिसरात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी एका ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

AI Generated Image
उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी एका ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागराज कोतवाल (पूर्ण नाव अज्ञात, रा. अष्टापूर, ता. हवेली, जि. पुणे) असे आरोपीचे नाव असून, त्याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारास संबंधित अल्पवयीन मुलगा ग्राफिक्स डिझाइनचे काम करण्यासाठी आरोपीच्या उरुळी कांचन येथील दुकानात गेला होता. कामानंतर आरोपीने मुलाला उशीर होणार असल्याचे घरी कळवण्यास सांगून त्याला गाडीतून भांडगाव (ता. दौंड) परिसरात नेले. तेथे आरोपीने जबरदस्तीने त्याच्याशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर आरोपीने पुन्हा उरुळी कांचन येथे आणूनही गैरवर्तन केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. घरी परतल्यानंतर मुलाने आईला घडलेला प्रकार सांगितला. भीतीपोटी तक्रार देण्यास उशीर झाला असला तरी, अखेर आईसह पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गु.र.नं. ९०/२०२६ अन्वये POCSO कायद्याच्या कलम ७, ८, ११(१), १२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.