मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 22:18 IST2026-04-19T22:18:07+5:302026-04-19T22:18:52+5:30
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर ५० दिवस झाले तरी अंत्यविधी का झाला नाही?

मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई मारले जाऊन आता ५० दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत इराण सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. युद्ध आणि युद्धविराम यांच्या कात्रीत अडकलेले इराण सरकार सध्या कमालीच्या दहशतीखाली असून, खामेनेईंच्या सार्वजनिक अंत्यविधीतून देशात मोठी अशांती पसरेल आणि इराणची कमकुवत स्थिती जगासमोर उघड होईल, अशी भीती सरकारला सतावत आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या एका भीषण हवाई हल्ल्यात खामेनींचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडाला. जरी सध्या अमेरिका आणि इराणमध्ये तात्पुरता युद्धविराम असला, तरी खामेनेईंच्या दफनविधीबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणचे अधिकारी सध्या मोठा सार्वजनिक अंत्यविधी आयोजित करण्यास खूप घाबरलेले आहेत.
१९८९ची पुनरावृत्ती होण्याची भीती
इराणचा इतिहास पाहिला तर, १९८९ मध्ये जेव्हा पहिले सर्वोच्च नेते अयातुल्ला रुहोल्लाह खोमेनी यांचे निधन झाले होते, तेव्हा लाखो इराणी नागरिक तेहरानच्या रस्त्यावर उतरले होते. मात्र, आजची परिस्थिती वेगळी आहे. 'फाउंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रेसीज'चे तज्ज्ञ बेहनाम तालेब्लू यांच्या मते, इराण सध्या कोणताही धोका पत्करण्याच्या स्थितीत नाही. बुधवारी संपणारा अनिश्चित युद्धविराम आणि देशातील ढासळलेली सुरक्षा व्यवस्था यामुळे सरकार बॅकफुटवर आहे.
लष्करी नेतृत्वाचा खात्मा आणि इंटरनेट ब्लॅकआउट
युद्धाच्या गेल्या काही आठवड्यांत केवळ खामेनेईच नाही, तर इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. "इराण सरकार रस्त्यावर कब्जा करण्याच्या मोठ्या गप्पा मारते, पण गेल्या ५० दिवसांपासून देशात असलेला इंटरनेट ब्लॅकआउट सत्य परिस्थिती सांगण्यासाठी पुरेसा आहे," असे तालेब्लू यांनी नमूद केले. जनतेचा राग अनावर होऊन उठाव होईल, या भीतीने सरकारला ग्रासले आहे.
नियोजन झाले पण अंमलबजावणी नाही
मार्चच्या सुरुवातीला इराणच्या 'फार्श न्यूज'ने सांगितले होते की, खामेनींना त्यांच्या मूळ गावी म्हणजे मशहद येथे दफन केले जाईल. तेहरानमध्ये तीन दिवसांचा शोक सोहळा आणि सार्वजनिक श्रद्धांजली सभेची घोषणाही झाली होती. पण प्रत्यक्षात मात्र काहीच घडले नाही. ५० लाख लोकसंख्या असलेल्या मशहद शहरात अद्याप कोणतीही तयारी दिसून आलेली नाही.
युद्धाचे ढग पुन्हा गडद
येत्या बुधवारी अमेरिका आणि इराणमधील दोन आठवड्यांचा युद्धविराम संपत आहे. पाकिस्तानमधील शांतता चर्चा अपयशी ठरल्यानंतर आता पुढे काय, असा प्रश्न आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, जर बुधवारी कोणत्याही करारावर शिक्कामोर्तब झाले नाही, तर युद्ध पुन्हा सुरू होऊ शकते. दुसरीकडे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी आपल्या अण्वस्त्रांच्या अधिकारांचा पुनरुच्चार करत ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. या जागतिक तणावाच्या परिस्थितीत, आपल्या सर्वोच्च नेत्याचा सन्मानाने अंत्यविधी करणे इराणसाठी आता केवळ धार्मिक बाब उरलेली नसून ते मोठे राजकीय आव्हान बनले आहे.