- कल्याणराव आवताडे
धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागातून हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली आहे. अवघ्या १४ वर्षांचा श्रीश धेंडे बेपत्ता होऊन गुरुवारी (दि. १५) १० दिवस उलटले. पण ‘स्मार्ट’ म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहराचे प्रशासन आणि पोलिस यंत्रणा अजूनही अंधारात चाचपडत आहे. एकीकडे काळजाचा तुकडा हरवल्याने बाप ढसाढसा रडत आहे, तर दुसरीकडे सरकारी विभाग एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्यात मग्न आहेत.
दि. ६ एप्रिल रोजी श्रीश धेंडे हा मूर्ती विसर्जनासाठी कालव्यावर गेला होता. तेथून तो परतलाच नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता श्रीश सोबत असलेली काही मुले त्याचे कपडे आणि मोबाईल घेऊन पळताना स्पष्ट दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, सोबतच्या मुलांनी पोलिसांना परस्परविरोधी उत्तरे दिली. कोणी म्हटले तो बुडाला, तर कोणी म्हटले तो पळून गेला. इतके संशयास्पद पुरावे असूनही पोलिसांनी गुन्हा दाखल करायला तब्बल ८ दिवस लावले.
या घटनेने प्रशासनाचा अत्यंत क्रूर चेहरा समोर आणला आहे. श्रीशचा शोध घेण्यासाठी कालव्यातील पाण्याचा विसर्ग कमी करणे आवश्यक होते, परंतु अग्निशमन दल म्हणतेय पाणी जास्त आहे. जलसंपदा विभाग पाणी कमी करायला तयार नाही. पोलिस प्रशासन उजनी धरणात मृतदेह सापडण्याची वाट पाहत असल्यासारखे सुस्त बसले आहे. एका बाजूला डिजिटल इंडियाच्या गप्पा मारल्या जातात, पण एका बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी दोन सरकारी विभागांमध्ये समन्वय असू नये, ही शरमेची बाब आहे. प्रदीप धेंडे यांचे हे शब्द कोणत्याही संवेदनशील माणसाचे काळीज चिरणारे आहेत. ज्या व्यवस्थेने त्यांना आधार द्यायला हवा होता, त्याच व्यवस्थेच्या उंबरठ्यावर ते न्याय मागून थकले आहेत. पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवून थकल्यावर, आता ते स्वतः धायरी ते स्वारगेटपर्यंत झाडेझुडपे तोडून आपल्या मुलाचा शोध घेत आहेत.
संशयितांना पाठीशी का घातले जातेय?
सीसीटीव्हीमध्ये मुले कपडे चोरून नेताना दिसत आहेत, एक संशयास्पद रिक्षाचालक घटनास्थळी दिसत आहे, तरीही पोलिसांनी या मुलांचे साधे समुपदेशन किंवा रिक्षाचालकाची चौकशी का केली नाही? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. कोणाला वाचवण्यासाठी हा वेळकाढूपणा केला जात आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
प्रशासनाचे हे ‘पाप’ कधी धुणार?
आज श्रीशच्या जागी एखाद्या बड्या नेत्याचा किंवा अधिकाऱ्याचा मुलगा असता, तर यंत्रणांनी आकाशपाताळ एक केले नसते का? मग एका सामान्य रिक्षाचालकाच्या मुलासाठी हे नियम आणि तांत्रिक अडचणी आडव्या का येतात? जलसंपदा विभागाची ‘पाणी बंद करणार नाही’ ही निर्दयी भूमिका म्हणजे माणुसकीचा अंत आहे. एका आई-वडिलांच्या डोळ्यांतील पाणी जोपर्यंत प्रशासनाला दिसत नाही, तोपर्यंत ही व्यवस्था सुधारणे अशक्य आहे. श्रीशचा शोध लागो न लागो, पण या निमित्ताने प्रशासनाचा जो ढिम्म आणि क्रूर चेहरा समोर आला आहे, त्याला जनता कधीही माफ करणार नाही.
माझ्या मुलाला शोधायला मी स्वतः पदरचे पैसे खर्च करून जेसीबी लावलाय. ही सरकारी यंत्रणा फक्त आमचा अंत बघायला बसली आहे का? - प्रदीप धेंडे, श्रीशचे वडील
Web Summary : Search for missing Shreesh Dhende stalls; administration's callousness is questioned. Despite evidence, police delayed filing a case. Father desperately searches as authorities bicker, failing to coordinate efforts. Public outrage grows over perceived indifference.
Web Summary : लापता श्रीश धेंडे की खोज में देरी; प्रशासन की संवेदनहीनता पर सवाल। सबूतों के बावजूद, पुलिस ने मामला दर्ज करने में देरी की। अधिकारी समन्वय में विफल, पिता बेताब होकर खोज रहे हैं। जनता में आक्रोश।