'ज्योती सावित्री जिल्हा परिषद' शाळा प्रकरणी गटशिक्षणाधिकारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 10:15 IST2026-04-17T10:15:32+5:302026-04-17T10:15:55+5:30
पुणे : खानवडी येथील 'ज्योती सावित्री जिल्हा परिषद' शाळा प्रकरणात चुकीची माहिती प्रसारित करणे आणि गैरवर्तन करणे प्रभारी गट ...

'ज्योती सावित्री जिल्हा परिषद' शाळा प्रकरणी गटशिक्षणाधिकारी निलंबित
पुणे : खानवडी येथील 'ज्योती सावित्री जिल्हा परिषद' शाळा प्रकरणात चुकीची माहिती प्रसारित करणे आणि गैरवर्तन करणे प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना महागात पडले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने कडक पाऊल उचलत विस्तार अधिकारी (शिक्षण) तथा प्रभारी गटशिक्षण अधिकारी गोविंद हरिभाऊ लाखे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
खानवडी येथील शाळेला लाखे यांनी भेट दिली होती. मात्र, या भेटीनंतर त्यांनी अधिकृत तथ्य न तपासता चुकीची माहिती बाहेर प्रसारित केली. यामुळे जिल्हा परिषदेसारख्या जबाबदार संस्थेची नाहक बदनामी झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या गंभीर शिस्तभंगाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी निलंबनाचे आदेश जारी केले. लाखे यांच्यावर 'महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४' मधील नियम ३(१) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबन कालावधीत लाखे यांचे मुख्यालय पुरंदरवरून हलवून पंचायत समिती वेल्हा येथे निश्चित करण्यात आले आहे.
दरम्यान, या शाळाप्रकरणी झेडपीचे सीईओ गजानन पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली. यात प्रवेशाची क्षमता २६० असून, ज्युनिअर केजीपासून बारावीपर्यंत सीबीएसई मंडळ संलग्नित ही शाळा आहे. या शाळेला राज्य शासनाची मान्यता असून, सीबीएसई बोर्डाकडून मान्यतेची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या शाळेतील सर्व प्रवेश पारदर्शक पद्धतीने झाल्या असून, स्थानिक नागरिकांच्या मुलांना प्राधान्य देण्यात आले आहेत. याच पद्धतीने प्रत्येक तालुक्यात एक सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली.