Pune Nasrapur Case:...म्हणून आम्ही सौम्यबळाचा वापर केला; महामार्गावर झालेल्या आंदोलनावरून पुणे पोलिसांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 15:55 IST2026-05-04T15:54:20+5:302026-05-04T15:55:16+5:30

आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचे व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याने पुणे पोलिसांकडून याबाबत लेखी स्पष्टीकरण देण्यात आले आहे

Pune Nasrapur Case so we used mild force Pune Police explanation on the protest on the highway | Pune Nasrapur Case:...म्हणून आम्ही सौम्यबळाचा वापर केला; महामार्गावर झालेल्या आंदोलनावरून पुणे पोलिसांचे स्पष्टीकरण

Pune Nasrapur Case:...म्हणून आम्ही सौम्यबळाचा वापर केला; महामार्गावर झालेल्या आंदोलनावरून पुणे पोलिसांचे स्पष्टीकरण

पुणे: भोर तालुक्यातील नसरापूर येथे बालिकेवर अत्याचार प्रकरणानंतर शनिवारी (दि. २) सायंकाळी मुंबई-बंगळुरू महामार्गावर आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक चार तासांपेक्षा जास्त काळासाठी ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलक आणि पीडित बालिकेच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. मात्र, काही जण आंदोलन मागे घेण्याच्या स्थितीत नव्हते, आंदोलनामुळे अनेक जण वाहतूक कोंडीत अडकले होते. अखेर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला, असे पुणे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

नसरापूर प्रकरणानंतर शनिवारी सायंकाळी महामार्गावरील नवले पूल परिसरात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचे व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यानंतर पुणे पोलिसांकडून याबाबत लेखी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी पोलिसांची बाजू मांडली.

नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर शनिवारी दिवसभर पीडित बालिकेच्या कुटुंबीयांशी सातत्याने संवाद साधण्यात येत होता. कुटुंबीय थकले होते. पोलिस आणि प्रशासनाने त्यांना लेखी आश्वासन दिले होते. कुटुंबीयांची आंदोलन संपवण्याची इच्छा होती. महामार्गावरील नवले पूल परिसरात गर्दी झाली होती. काही जण आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधला. मात्र, काही जण अडवणूक करण्याच्या भूमिकेत होते. कुटुंबीयांना लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे वाहनापर्यंत पोहोचवण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून बालिकेचा मृतदेह पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कारासाठी शनिवारी रात्री रवाना करण्यात आला. आंदोलन करणारे काही जण ठाम होते. त्यांना पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर करण्यात आला आणि गर्दी हटवण्यात आली, असे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महामार्गावरील नवले पूल परिसर शनिवारी सायंकाळनंतर चार तासांहून अधिक काळ वाहतुकीसाठी बंद होता. दोन्ही बाजूंनी १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हजारो प्रवासी वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. त्यात महिला आणि लहान मुले होते. रुग्णवाहिका कोंडीत अडकून पडल्या होत्या. पोलिसांनी हे आंदोलन संयम राखून हाताळले आहे’, असे पोलिस उपायुक्त कदम यांनी नमूद केले.

नसरापूर अत्याचार प्रकरण संवेदनशील आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. तपास प्रक्रियेत पीडित बालिकेच्या कुटुंबीयांना विश्वासात घेण्यात आले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस कटिबद्ध आहेत. नागरिकांनी पोलिस, तसेच न्याय यंत्रणेवर विश्वास ठेवावा’, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

Web Title : पुणे पुलिस ने नसरापुर विरोध में हल्के बल के प्रयोग को स्पष्ट किया

Web Summary : पुणे पुलिस ने राजमार्ग को अवरुद्ध करने वाले नसरापुर विरोध को तितर-बितर करने के लिए हल्के बल का प्रयोग किया। यातायात घंटों तक बाधित रहा, जिससे असुविधा हुई। पुलिस ने अडिग प्रदर्शनकारियों और यातायात की भीड़ को कारण बताया।

Web Title : Pune Police Clarify Use of Mild Force in Nasrapur Protest

Web Summary : Pune police used mild force to disperse Nasrapur protest blocking highway. Traffic halted for hours, causing inconvenience. Police cite unyielding protesters and traffic congestion as reasons.