प्राचार्यांकडून खंडणी उकळल्याचे प्रकरण; पीएसआय बडे, कर्मचारी सुदाम तायडेला अटक; सोनाली हिंगे फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 10:37 IST2026-05-16T10:31:46+5:302026-05-16T10:37:36+5:30
Crime News - गेल्या काही दिवसांपूर्वी या तिघांवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बडतर्फीचीदेखील कारवाई केली आहे.

प्राचार्यांकडून खंडणी उकळल्याचे प्रकरण; पीएसआय बडे, कर्मचारी सुदाम तायडेला अटक; सोनाली हिंगे फरार
पुणे : मंगळवार पेठेतील एका नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांना बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून, संस्थेची बदनामी करण्याच्या धाकाने ब्लॅकमेल करत सात लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिस उपनिरीक्षक अजित बडे आणि पोलिस कर्मचारी सुदाम तायडे या दोघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने शुक्रवारी (दि.१५) अटक केली, तर महिला पोलिस कर्मचारी सोनाली हिंगे अद्याप फरार आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून हे तिघेही फरार होते, त्यातील दोघांना ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या तिघांवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बडतर्फीचीदेखील कारवाई केली आहे.
शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील दामिनी पथकात काम करणाऱ्या सोनाली हिंगे हिची एका अल्पवयीन मुलीसोबत जिममध्ये ओळख झाली. तिला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात खेचले. पुढे त्याच मुलीचा वापर करून पीएसआय अजित बडे, सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे या तिघांनी एका नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांना ब्लॅकमेल करून सात लाखांची खंडणी उकळली.
दरम्यान, ठरल्याप्रमाणे या तिघांनी त्या मुलीला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला नाही. अगोदर ज्या कॉलेजमध्ये तिचा प्रवेश होता तोही रद्द झाला. त्यामुळे त्या मुलीने आपल्या कुटुंबीयांना सोबत घेऊन थेट पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. त्यावेळी या खंडणीखोरीच्या प्रकरणाला वाचा फुटली. पोलिसांनी प्राचार्यांना बोलावून घेतले. त्यावेळी त्यांनी या तिघांच्या कृत्याचा पाढा वाचला. पीएसआय बडे, कर्मचारी हिंगे, आणि तायडे या तिघांच्या विरुद्ध प्राचार्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.