इंडोनेशियातून फोन, प्रेमळ गप्पा अन्..! पुण्यात दोन महिलांना तब्बल १२.८५ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 17:08 IST2026-05-10T17:06:27+5:302026-05-10T17:08:42+5:30
- भेटवस्तू पाठवण्याचे आमिष दाखवून महिलेकडून ५ लाख ७० हजार रुपये घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गायकवाड पुढील तपास करत आहेत.

इंडोनेशियातून फोन, प्रेमळ गप्पा अन्..! पुण्यात दोन महिलांना तब्बल १२.८५ लाखांचा गंडा
पुणे : सोशल मीडियावरील ओळख दोन महिलांना महागात पडली. परदेशातून भेटवस्तू पाठवण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांची १२ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केली. हडपसर भागातील हांडेवाडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेची सायबर चोरट्यांनी ७ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरोधात काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महिलेची सोशल मीडियाद्वारे सायबर चोरट्यांशी ओळख झाली होती. चोरट्यांनी इंडोनेशियातून बोलत असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर चोरट्याने महिलेला भेटवस्तू पाठवण्याचे आमिष दाखवले. भेटवस्तू पाठवल्या असून सीमाशुल्क विभागाने (कस्टम) जप्त केल्या आहेत, असे सांगून महिलेला तातडीने एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने चोरट्याच्या खात्यात पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्याने त्याचा मोबाइल नंबर बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाबर पुढील तपास करत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत विवाहाच्या आमिषाने सायबर चोरट्याने एका महिलेची ५ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका महिलेने वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसरा, तक्रारदार ३५ वर्षीय महिला वाघोली भागात राहायला आहे. सोशल मीडियाद्वारे महिलेची सायबर चोरट्यांशी ओळख झाली. विवाहाचे आमिष दाखवून चोरट्याने महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर भेटवस्तू पाठवण्याचे आमिष दाखवून महिलेकडून ५ लाख ७० हजार रुपये घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गायकवाड पुढील तपास करत आहेत.