बारामती हादरलं..! अत्याचारानंतर गर्भपात करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 11:56 IST2026-04-30T11:54:06+5:302026-04-30T11:56:30+5:30

Baramati Crime: 'बारामती - फलटण कनेक्शन'; अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाले असल्याचा संशय

Pune crime Baramati shaken Attempt to destroy evidence by performing abortion after torture | बारामती हादरलं..! अत्याचारानंतर गर्भपात करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

बारामती हादरलं..! अत्याचारानंतर गर्भपात करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

सोमेश्वरनगर :बारामती तालुक्यातील एका अल्पवयीन १३ वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचार व त्यानंतर करण्यात आलेल्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाच्या तपासादरम्यान गर्भपातासाठी फलटण शहरातील अहिल्याबाई होळकर चौक (पृथ्वी चौक) खासगी दवाखान्याचे नाव पुढे आले आहे. प्राथमिक माहितीनुसार या दवाखान्यात डॉ. नरुटे यांनी गर्भपात केल्याचे तपासात दिसून येत आहे.

बारामती तालुक्यातील संबंधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर गर्भधारणा झाल्याचे समोर आले. या घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने गर्भपात केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी व आरोग्य विभागाने संयुक्तपणे तपास सुरू केला असून, गर्भपात नेमका कुठे, कधी आणि कोणाच्या मदतीने करण्यात आला याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात फलटण शहरातील काही शासकीय डॉक्टरांची नावेही पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या तपासाचा आवाका अधिक वाढणार असून, वैद्यकीय क्षेत्रातील काही व्यक्तींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाले असल्याचा संशय असून, संबंधित दवाखान्यातील नोंदी, वैद्यकीय कागदपत्रे, रुग्णालयातील स्टाफचे जबाब, तसेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी काही महत्त्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहितीही समोर येत आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत असून, अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारासोबतच गर्भपात प्रकरणातील वैद्यकीय निष्काळजीपणा व बेकायदेशीर प्रक्रिया उघड झाल्यास आरोग्य विभागाकडून संबंधित दवाखान्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोक्साे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास वेगाने सुरू आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणातील आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिस व आरोग्य विभागाकडून अधिकृत माहिती येणे बाकी असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच सर्व बाबी स्पष्ट होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

संबंधित आरोपीने वडगाव पोलिस ठाण्यामध्ये कोठडीमध्ये आत्महत्या केली. रवींद्र व्यंकट गार्डी (वय ४८, रा. चव्हाण वस्ती, कोऱ्हाळे खुर्द, ता. बारामती) असे मृत आरोपीचे नाव आहे. संबंधित आरोपीवर १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप होता. या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती झाल्याची बाब समोर आली होती.

इतर पुराव्यांच्या आधारे, तसेच साक्षीदारांच्या जबाबांच्या अनुषंगाने डॉ. नरुटे यांचे नाव निष्पन्न झाले आहे. तसेच, सदर बाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे.- नागनाथ पाटील,सहायक पोलिस निरीक्षक, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन, बारामती. 

Web Title : बारामती में सनसनी: नाबालिग से बलात्कार, सबूत मिटाने के लिए गर्भपात?

Web Summary : बारामती में 13 वर्षीय नाबालिग से बलात्कार और अवैध गर्भपात से हड़कंप। पुलिस निजी क्लिनिक और चिकित्सा लापरवाही की जांच कर रही है। आरोपी ने हिरासत में आत्महत्या कर ली। जांच जारी है।

Web Title : Baramati Shaken: Minor's Rape, Abortion to Destroy Evidence?

Web Summary : Baramati rocked by alleged rape of a 13-year-old, followed by illegal abortion. Police investigate private clinic and potential medical negligence. The accused committed suicide in custody. Investigation continues to uncover all involved.