एकाला वाचवण्यासाठी दुसरा पाण्यात उतरला; तळ्यात बुडून २ चिमुकल्यांचा मृत्यू, जुन्नर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 17:31 IST2026-04-28T17:31:16+5:302026-04-28T17:31:56+5:30
योग्य संरक्षणभिंत, चेतावणी फलक व देखरेख व्यवस्था असती, तर ही घटना टाळता आली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली

एकाला वाचवण्यासाठी दुसरा पाण्यात उतरला; तळ्यात बुडून २ चिमुकल्यांचा मृत्यू, जुन्नर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
ओतूर : जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी परिसरात मंगळवार, दि. २१ एप्रिल रोजी दुपारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत दोन निरागस मुलांचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावाच्या उत्तरेकडील भागात एका तळ्याला कंपाउंड करण्याचे काम सुरू होते; मात्र हे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने तळ्याभोवती कोणतीही सुरक्षितता व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. अंदाजे ५० फूट खोल पाणी असलेल्या या तळ्यात दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
सोहम जयसिंग नवले (वय १२) हा मुलगा प्रथम तळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी विघ्नेश महेश पवार (वय ८) रा. बल्लाळवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) हा दुसरा मुलगाही तळ्यात उतरला. मात्र पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. ही घटना कार्तिक नवले याने पाहताच त्याने तत्काळ घरी जाऊन माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने शोधकार्य सुरू केले. सुमारे १५ मिनिटांच्या प्रयत्नानंतर सोहमला बाहेर काढण्यात आले, तर विघ्नेशचा शोध घेत तब्बल दोन तासांनी त्याला पाण्याबाहेर काढण्यात रेस्क्यू टीम यश आले.
दोन्ही मुलांना तातडीने रेस्क्यू पथक व पोलिसांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत गोरे यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी प्रवीण संपोंगे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी ओतूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. संबंधित तळ्याची जागा डॉ. विनोद ढवळे यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपूर्ण काम व सुरक्षा उपाययोजनांचा अभाव यामुळे ही दुर्घटना घडल्याची चर्चा गावकऱ्यांतून होत आहे. योग्य संरक्षणभिंत, चेतावणी फलक व देखरेख व्यवस्था असती, तर ही घटना टाळता आली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
घटनेच्या पार्श्वभूमीवर सरपंच संजय नायकोडी, सामाजिक कार्यकर्ते सुधीर महाराज घोलप आणि ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक प्रभारी अधिकारी प्रवीण संपोंगे यांनी नागरिकांना आवाहन केले की उन्हाळी सुट्टीत मुले बाहेर खेळायला जात असल्याने पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवावे. तळी, विहिरी, ओढे किंवा बांधकाम सुरू असलेल्या धोकादायक ठिकाणी मुलांना एकटे जाऊ देऊ नये. तसेच ग्रामस्थांनीही सुरक्षा उपाययोजना करून चेतावणी फलक लावावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.