मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 22:28 IST2026-04-28T22:28:04+5:302026-04-28T22:28:40+5:30
खरेतर, विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी पक्षातील अनेकांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर केला आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली.

मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी आता भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने ५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महत्वाचे म्हणजे, भाजपने यावेळीही धक्कातंत्राचा वापर केला आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
यांना मिळाली संधी? -
खरेतर, विधानपरिषदेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी पक्षातील अनेकांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर केला आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली. भाजपने मंगळवारी जारी केलेल्या या यादीत, सुनील विनायक कर्जतकर (Sunil Vinayak Karjatkar), माधवी नाईक (Madhavi Naik), संजय नत्थूजी भेंडे (Sanjay Natthuji Bhende), विवेक बिपिनदादा कोल्हे (Vivek Bipindada Kolhe) आणि प्रमोद शांताराम जठार (Pramod Shantaram Jathar) यांचा समावेश आहे.
तत्पूर्वी, राज्य भाजपने साधारणपणे ३० जणांची यादी पक्षाच्या दिल्लीतील वरिष्ठांकडे पाठवली होती. यानंतर, वरिष्ठांकडून ही यादी छोटी करून मागण्यात आली होती. यानतंर आता या पाच नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. याशिवाय, विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला राम-राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
कोण आहेत हे नेते? -
सुनील कर्जतकर हे भाजपचे संघटन मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. संजय भेंडे हे नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत आणि भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत. माधवी नाईक या ठाण्याच्या असून भाजपच्या महामंत्री आहेत. प्रमोद जठार हे कोकणातील कणकवली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. तर कोपरगावचे विवेक कोल्हे हे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र तथा सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत.
या आमदारांचा कार्यकाळ संपणार -
येत्या १३ मे २०२६ रोजी विधान परिषदेचा कार्यकाळ संपत असलेल्या ९ सदस्यांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश कराड (भाजप) आणि प्रवीण दटके यांचा समावेश आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम -
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे – २३ एप्रिल, २०२६ (गुरुवार)
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस – ३० एप्रिल, २०२६ (गुरुवार)
उमेदवारी अर्जांची छाननी – २ मे, २०२६ (शनिवार)
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – ४ मे, २०२६ (सोमवार)
मतदानाचा दिनांक – १२ मे, २०२६ (मंगळवार)
मतदानाची वेळ – सकाळी ०९:०० ते दुपारी ०४:०० पर्यंत
मतमोजणी (निकाल) – १२ मे, २०२६ (मंगळवार) सायंकाळी ०५:०० वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक – १३ मे, २०२६ (बुधवार)