मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 22:56 IST2026-04-28T22:55:22+5:302026-04-28T22:56:14+5:30
"एक साधरण भेटी होती राजकीय भेट नव्हती, छत्रपती संभाजीनगरला उद्योग विभागाच्या कार्यक्रमाला आलो होतो. राजकारणापलीकडे मनोज दादाचे अन् माझे संबंध आहेत. सकाळी ७:३० वाजता विमान असल्याने गप्पा कोणाबरोबर मारायच्या म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलो. त्यांच्या सोबत मनसोक्त गप्पा मारल्या."

मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मंगळवारी सायंकाळी अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली. मंत्री उदय सामंत हे अंतरवाली सराटी येथील सरपंच यांच्या मळ्यात दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याचे समजते मात्र भेटी मागचे कारण काय? दोघांमध्ये काय चर्चा झाली? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
महत्वाचे म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच जरांगे पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आज उदय सामंत यांनी अचानक जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मात्र, या भेटी मागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, "मनोज जरांगे पाटील यांचे आणि माझे राजकारणा पलीकडचे संबंध आहेत. मनसोक्त गप्पा मारण्यासठी आलो होतो," असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले उदय सामंत -
"एक साधरण भेटी होती राजकीय भेट नव्हती, छत्रपती संभाजीनगरला उद्योग विभागाच्या कार्यक्रमाला आलो होतो. राजकारणापलीकडे मनोज दादाचे अन् माझे संबंध आहेत. सकाळी ७:३० वाजता विमान असल्याने गप्पा कोणाबरोबर मारायच्या म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलो. त्यांच्या सोबत मनसोक्त गप्पा मारल्या. मराठा उप समितीमध्ये मी सदस्य आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काय चालू आहे ते देखील त्यांना सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून ज्या काही अपेक्षा व्यक्त केल्या आहे. त्यांवर सविस्तर चर्चा झाली. मराठा आरक्षणासंदर्भातील सकारात्मक बाजू सांगितली असून त्यात काय त्रुटी आहेत, हेही सांगितले. हे उद्याच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये मी मांडेल" असेही उदय सामंत यांनी म्हटले आहे.