विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 20:14 IST2026-04-28T20:13:28+5:302026-04-28T20:14:01+5:30
अंदाजानुसार, मंगळवारीच विदर्भातील बहुतेक जिल्ह्यावर अवकाळीचे ढग जमा झाले आहेत. त्यामुळे तापमानात किंचित घट झाली, पण अनेक दिवसांपासून तीव्र ताप सहन करणाऱ्या जिल्ह्यांना त्यातून काहीच दिलासा मिळाला नाही. ४६ अंशाच्या वर गेलेल्या तीन जिल्ह्यात तापमान ४५ वर आले आणि नागपूरसह चार जिल्ह्यात ४४ अंशाच्या वर तापमानाची नाेंद झाली.

विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
नागपूर : हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याप्रमाणे विदर्भातही काही जिल्ह्यात आकाश अवकाळीच्या ढगांनी व्यापले आहे. २९ एप्रिल ते १ मे या काळात ४० ते ५० किमी वेगाने वाहणारे वादळी वारे, विजांचा कडकडाट व ढगांच्या गर्जनेसह काही ठिकाणी तुरळक व गारपीटीचा पाऊस हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमान २ ते ३ अंशाने घटून उकाड्याचा त्रास किंचित कमी हाेईल, असा अंदाज आहे.
अंदाजानुसार मंगळवारीच विदर्भातील बहुतेक जिल्ह्यावर अवकाळीचे ढग जमा झाले आहेत. त्यामुळे तापमानात किंचित घट झाली, पण अनेक दिवसांपासून तीव्र ताप सहन करणाऱ्या जिल्ह्यांना त्यातून काहीच दिलासा मिळाला नाही. ४६ अंशाच्या वर गेलेल्या तीन जिल्ह्यात तापमान ४५ वर आले आणि नागपूरसह चार जिल्ह्यात ४४ अंशाच्या वर तापमानाची नाेंद झाली.
साेमवारपर्यंत अकाेला, अमरावती, वर्धा जिल्ह्यातील तापमान ४६ अंशावर हाेते, ज्यात २४ तासात एक ते दीड अंशाची घट झाली व तापमान अनुक्रमे ४५.२ व ४५ अंशावर खाली आले. दुसरीकडे मंगळवारी नागपूरला ४४.४ अंश, चंद्रपूर ४४.८ अंश आणि गडचिराेली व यवतमाळ येथे ४४ अंशाची नाेंद झाली. वाशिम आणि ब्रम्हपुरीत ४३ च्यावर आणि इतर जिल्ह्यामध्ये पारा ४२ अंशाच्या वर आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव शहराचा पारा विदर्भातील उष्ण शहरांप्रमाणे ४४ अंशावर हाेता. आकाशातील ढग व आर्द्रतायुक्त वातावरणामुळे या तापमानाची तीव्रता अधिक जाणवत हाेती. मात्र कुठेही पावसाची नाेंद झाली नाही.
पावसाळी वातावरणामुळे १ मे पर्यंत कमाल तापमानात २ ते ३ अंशाची घट हाेईल आणि त्यानंतर ते पुन्हा वाढेल असा वेधशाळेचा अंदाज आहे.