सुरक्षाविषयक उपाययोजना नाहीत; तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू, तिघांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 17:17 IST2026-05-12T17:15:26+5:302026-05-12T17:17:18+5:30
तिसऱ्या मजल्यावर खडी उतरवित असताना मजुराचा तोल गेल्याने ते गंभीर जखमी झाले, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला

सुरक्षाविषयक उपाययोजना नाहीत; तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू, तिघांविरुद्ध गुन्हा
पुणे: नियोजित गृहप्रकल्पात तिसऱ्या मजल्यावरून खडी उतरवत असताना तोल जाऊन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाला आहे. ही घटना वडगाव शेरी भागात घडली. सुरक्षाविषयक काळजी न घेणे, तसेच दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
शंकर डुबकवाड (वय ५१, रा. बाेराटे वस्ती, खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याप्रकरणी रमेश वंजारी, सुभाष साकोरे (रा. वडगाव शेरी), तसेच नामदेव गणगोपालवा (रा. बाेराटे वस्ती, खराडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत डुबकवाड यांचा मुलगा शिवानंद याने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी भागातील गणेशनगर भागात तीन मजली इमारतीचे काम सुरू आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर डुबकवाड हे रविवारी (दि. १०) दुपारी पावणे चारच्या सुमारास काम करीत होते. त्यावेळी तिसऱ्या मजल्यावर खडी उतरवित असताना डुबकवाड यांचा तोल गेला. तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. बांधकाम ठेकेदार, तसेच संबधित इमारतीचे बांधकाम करुन घेणाऱ्या मालकांनी सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या नव्हत्या. नियोजित इमारतीच्या परिसरात संरक्षक जाळी बसविण्यात आली नव्हती. सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे डुबकवाड यांचा मुलगा शिवानंद याने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक बाबर तपास करीत आहेत.