822 Runs in 50 Overs Cricket News: क्रिकेटमध्ये एकेकाळी ३०० धावा ही अवाढव्य धावसंख्या मानली जात होती. सध्याही वनडे सामन्यात ४०० पार ही धावसंख्या सामना जिंकवून देण्यासाठी पुरेशी मानली जाते. पण झिम्बाब्वेच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये जे घडले, ते वेगळेच होते. २०२५-२६ च्या 'मास्विंगो ५० ओव्हर फर्स्ट लीग'मध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात स्कॉर्पियन्स क्रिकेट क्लबने ५० षटकांत ८२२ धावा केल्या. त्यानंतर मेथवेन लायन्सचा अवघ्या २८ धावांवर सफाया केला आणि सामना ७९४ धावांनी जिंकला.
स्कॉर्पियन्सकडून तुफान फटकेबाजी
स्कॉर्पियन्सचा कर्णधार प्रेझ माकाझाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मग मैदानावर धावांचा पाऊस पडला. सलामीवीर विल्फ्रेड माटेंडे आणि ताकुंडा माडेम्बो यांनी अगदी सुरुवातीपासूनच गोलंदाजांना लक्ष्य केले. त्यांचा पहिला बळी २१.३ षटकांत बाद झाला, तेव्हा माटेंडेने आपले द्विशतक पूर्ण केले होते. त्याने अवघ्या ७५ चेंडूंमध्ये २३ चौकार आणि १३ षटकारांसह २०३ धावा ठोकल्या.
ताकुंडा माडेम्बोचे त्रिशतक, नंतर रिटायर्ड
दुसरीकडे मडेम्बोने एकट्यानेच त्रिशतकी मजल मारली. रिटायर्ड हर्ट होण्यापूर्वी त्याने १४३ चेंडूंमध्ये ३०२ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ५० चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर व्हिन्सेंट मोयोने ३९ चेंडूंमध्ये ७८ धावा ठोकल्या, तर गॅब्रिएल जयाने अवघ्या ४९ चेंडूंमध्ये नाबाद ११० धावा केल्या. गोलंदाजी संघाने एकूण १०८ अतिरिक्त धावा दिल्या. त्यामुळे संघाच्या ८२२ धावा झाल्या.
फलंदाजीनंतर गोलंदाजांची जादू!
स्कॉर्पियन्सच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे मेथवेन लायन्स संघ केवळ २८/७ (७.५ षटकांत) धावांपर्यंतच पोहोचू शकला आणि सामना थांबवण्यात आला. मेथवेन लायन्स संघ ७९४ धावांनी हरला. क्रिकेटच्या इतिहासात इतक्या मोठ्या फरकाने झालेला पराभव क्वचितच पाहायला मिळाला आहे.