PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 21:34 IST2026-05-12T21:31:36+5:302026-05-12T21:34:16+5:30
देश कठीण काळातून जात असताना सर्वांनी देशाच्या पाठीशी उभे रहायला हवे. असे टिकैत यांनी म्हटले आहे...

PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला पेट्रोल-डिझेलची बचत करण्याचे, सोन्यातील गुंतवणूक कमी करण्याचे आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. यावर आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुझफ्फरनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना टिकैत यांनी मोदींच्या आवाहनाचे समर्थन केले आहे. देश कठीण काळातून जात असताना सर्वांनी देशाच्या पाठीशी उभे रहायला हवे. असे टिकैत यांनी म्हटले आहे.
सोने खरेदी कमी करण्यासंदर्भात टिकैत यांचा 'सल्ला' -
सोन्याची खरेदी कमी करण्याच्या मुद्द्यावर टिकैत यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, खाप पंचायती नेहमीच साधेपणाचा पुरस्कार करत आल्या आहेत. लग्नकार्यातील सोन्याच्या वापरावर मर्यादा आणण्यासाठी सरकारने कायदा तयार करावा. जेणेकरून या क्षेत्रातील अनावश्यक खर्च कमी होईल. तसेच, पेट्रोल आणि डिझेलची बचत करण्यासाठी नागरिकांनी शक्य तेवढे प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेली केले.
शेतकऱ्यांसाठी थेट सबसिडीची मागणी -
सेंद्रिय शेतीसंदर्भात बोलताना टिकैत म्हणाले, शेतकरी संघटना बऱ्याच काळापासून थेट सबसिडीची मागणी करत आहे. मात्र, खतांची सबसिडी थेट शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार थेट सबसिडी देण्यात यावी, जेणेकरून सेंद्रिय शेतीला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळेल. याशिवाय, सेंद्रिय उत्पादनांसाठी मोठ्या शहरांमध्ये आणि मॉलमध्ये शेतकऱ्यांना स्वस्त दरात दुकाने उपलब्ध करून देण्यात यावीत. तसेच, भेसळ रोखण्यासाठी या उत्पादनांची कडक तपासणी होणेही गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
याच बरोबर, इंधन बचतीसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, विशेषतः बंद पडलेल्या लोकल ट्रेन पुन्हा सुरू करून, ही व्यवस्था अधिक बळकट करण्यावर त्यांनी भर दिला.