कल्याणराव आवताडे
धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील रहिवासी बालिका ऊर्फ पल्लवी विजय देशमुख यांनी तब्बल २० वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर संसाराची जबाबदारी सांभाळत बारावीची परीक्षा दिली. यात तब्बल ६५.५० टक्के गुण मिळवून एक नवा इतिहास त्यांनी रचला आहे. त्यांचे हे यश केवळ त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात नसून, स्वप्न पाहणाऱ्या आणि त्या दिशेने वाटचाल करणाऱ्या प्रत्येक गृहिणीसाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरले आहे.
पुण्यातील नऱ्हे भागात राहणाऱ्या बालिका ऊर्फ पल्लवी विजय देशमुख (माहेरचे नाव : बालिका राजेंद्र पवार) यांचे बालपण आणि तारुण्य शिक्षणाच्या ओढीने बहरले होते. बालिका यांचे माहेर धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील जवळा खुर्द. मात्र, आयुष्याच्या वळणावर १८ वर्षे वय झाल्यानंतर लगेचच त्यांचे लग्न झाले. आणि त्या पतीसोबत पुण्यात वास्तव्यास आल्या. संसार आणि जबाबदाऱ्यांच्या रेट्यात त्यांचे शैक्षणिक स्वप्न कुठेतरी मागे पडले. त्यानंतर दोन मुलांचे संगोपन, त्यांचा अभ्यास आणि घराच्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःच्या शिक्षणाचा विचार तसा बाजूलाच राहिला. पण, मनात शिक्षणाची धग आजही तेवढीच जिवंत होती.
अनेकांच्या आयुष्यात जबाबदाऱ्या संपतात, पण बालिका यांच्या आयुष्यात मात्र जबाबदाऱ्यांमधूनच नव्या संधीचा उगम झाला. त्यांच्या मनात शिक्षणाची तीव्र इच्छा पाहून त्यांचे पती विजय देशमुख यांनी त्यांना मोलाची साथ दिली. विजय हे स्वतःचा व्यवसाय करतात, पण त्यांनी आपल्या पत्नीला केवळ पाठिंबाच दिला नाही, तर पुन्हा शिक्षणाच्या प्रवासात खंबीर आधारस्तंभ बनले.
जिद्द आणि कष्टाचे फळ
बारावीचा अर्ज भरल्यापासून ते परीक्षेच्या दिवसापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. घरची कामे, मुलांचा सांभाळ आणि पुन्हा एकदा पुस्तकांशी मैत्री करणे यासाठी मोठी कसरत करावी लागली. मात्र, बालिका देशमुख यांनी ही कसरत आनंदाने स्वीकारली. त्यांनी लातूर विभागाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय येथून परीक्षेसाठी अर्ज भरला. त्यांच्या याच जिद्दीचे फळ म्हणजे, २० वर्षांच्या गॅपनंतरही त्यांनी ६५.५० टक्के गुण मिळवून मिळवलेले हे यश.
Web Summary : Balika Deshmukh, after a 20-year break to raise her family, passed her 12th-grade exams with 65.50%. Supported by her husband, she balanced household responsibilities with studying, proving an inspiration to homemakers. She took the exam in Dharashiv district.
Web Summary : बालिका देशमुख ने परिवार के लिए 20 साल के अंतराल के बाद 65.50% अंकों के साथ 12वीं की परीक्षा पास की। पति के सहयोग से, उन्होंने घर की जिम्मेदारियों और पढ़ाई को संतुलित किया, जो गृहणियों के लिए प्रेरणा है। उन्होंने धाराशिव जिले में परीक्षा दी।