जमिनीचा वाद; ५ लाखांसाठी पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 14:23 IST2026-04-28T14:22:18+5:302026-04-28T14:23:35+5:30
जाधववाडी येथे एक एकर नऊ गुंठे जमिनीच्या वाटपावरून दोघांमध्ये वाद होता. दरम्यान, एमएसआरडीसीची पाइपलाइन त्यांच्या शेतातून गेली त्याचे ५ लाख त्यांना मिळाले होते

जमिनीचा वाद; ५ लाखांसाठी पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना
पिंपरी : जमिनीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा कोयत्याने वार करून खून केला. ही घटना रविवारी (दि. २६ एप्रिल) रात्री अकराच्या सुमारास मावळ तालुक्यातील जाधववाडी येथे घडली. रवींद्र रमाकांत जाधव (वय ४५, रा. जाधववाडी, ता. मावळ) असे खून झालेल्या चुलत्याचे नाव आहे. विशाल सुखदेव जाधव याच्यासह त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव कुटुंबीयांची जाधववाडी येथे एक एकर नऊ गुंठे जमीन आहे. या जमिनीच्या वाटपावरून त्यांच्यात वाद होता. दरम्यान, एमएसआरडीसीची पाइपलाइन त्यांच्या शेतातून गेली. त्याचे त्यांना पाच लाख रुपये मिळाले होते. या पैशांच्या वाटपावरूनदेखील त्यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. रवींद्र जाधव हे आईसोबत जाधववाडी येथे राहत होते. रविवारी रवींद्र आणि पुतण्या विशाल यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यातून विशाल याने कोयत्याने रवींद्र यांच्यावर वार केला. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.