IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 16:53 IST2026-04-28T16:50:19+5:302026-04-28T16:53:30+5:30

IAS Narayan Konwar : नारायण कोंवर यांची गोष्ट अशाच एका जिद्दीची आहे, जिथे दु:खाने त्यांना हरवलं नाही तर पुढे जाण्याची ताकद दिली.

success story of Narayan Konwar who failed in 12th after father death and cracked upsc vegetable seller to ias journey | IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS

IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS

जेव्हा आयुष्य प्रत्येक वळणावर परीक्षा घेतं, तेव्हा हिंमत हीच माणसाची खरी ओळख ठरते. नारायण कोंवर यांची गोष्ट अशाच एका जिद्दीची आहे, जिथे दु:खाने त्यांना हरवलं नाही तर पुढे जाण्याची ताकद दिली. लहानपणी वडिलांना गमावल्यामुळे त्यांच्या मनावर खोलवर जखम झाली होती, पण स्वतःला सावरणं भाग होतं. घरखर्च चालवण्यासाठी त्यांनी भाजी विकली, पण आपलं शिक्षण थांबवलं नाही.

बारावीत नापास झाल्यानंतरही खचून न जाता पुढे चालत राहणं हाच एक पर्याय त्यांच्यासमोर होता. संघर्षाच्या काळातही त्यांनी ते स्वप्न जिवंत ठेवलं ज्याने त्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवलं. अखेर त्याच 'आयएएस' (IAS) होऊन हे सिद्ध केलं की, परिस्थिती नाही तर जिद्दच माणसाचं नशीब घडवते. त्यांची ही 'सक्सेस स्टोरी' सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

नारायण कोंवर हे मध्य आसाममधील मोरीगाव जिल्ह्याचे रहिवासी आहेत. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, जेव्हा ते अवघ्या ११-१२ वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं. इतक्या लहान वयात वडिलांचं छत्र हरवणं कोणत्याही मुलासाठी मोठा धक्का असतो. अचानक कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली, पण आईच्या साथीने त्यांनी हार मानली नाही आणि कठीण परिस्थितीतही आपलं शिक्षण सुरू ठेवलं.

आर्थिक चणचण आणि जबाबदाऱ्यांचं ओझं सांभाळून शिक्षण घेणं सोपं नव्हतं. घरापासून १५ किलोमीटर लांब शाळेत जाणं-येणं आणि सोबत काम करणं हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान होतं. या धावपळीत त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं आणि ते बारावीच्या परीक्षेत नापास झाले. हे अपयश त्यांच्यासाठी मोठा धक्का होता, ज्यामुळे ते निराश झाले आणि त्यांना लोकांच्या टोमण्यांचाही सामना करावा लागला.

नापास झाल्यानंतर नारायण यांनी हार मानण्याऐवजी स्वतःला पुन्हा सावरलं. यावेळी कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचं असा ठाम निर्धार त्यांनी केला. अहोरात्र मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. "अपयश हा आयुष्याचा शेवट नसून ती एका नव्या सुरुवातीची संधी असते" असं ते मानतात.

आयुष्यातील संकटांशी लढत असताना नारायण यांनी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी छोटं-मोठं काम करण्याचा निर्णय घेतला. भाजी विकून घर चालवण्यासोबतच त्यांनी आपलं उच्च शिक्षण सुरू ठेवलं. गुवाहाटी विद्यापीठातून पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी समाजासाठी काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न पाहिलं आणि नागरी सेवा परीक्षेची (UPSC) तयारी सुरू केली. त्यांची ही अपार मेहनत फळाला आली आणि त्यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं.

२०१० च्या यूपीएससी परीक्षेत ११९ वा रँक मिळवून नारायण यांनी हे सिद्ध केलं की, जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट मोठी नसते. आज ते केवळ एक यशस्वी आयएएस अधिकारीच नाहीत, तर समाजासाठी एक आदर्श आहेत. सध्या ते आसामच्या उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण विभागात सचिव पदावर कार्यरत आहेत. ते सातत्याने तरुणांना मार्गदर्शन करत आहेत.

Web Title: success story of Narayan Konwar who failed in 12th after father death and cracked upsc vegetable seller to ias journey