heatstroke: तापमान वाढीमुळे उष्माघाताचा धोका, खबरदारी घ्या, नाही तर येईल चक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 16:32 IST2026-04-18T16:31:57+5:302026-04-18T16:32:06+5:30
- सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी वैद्यकीय विभागाची यंत्रणा सज्ज

heatstroke: तापमान वाढीमुळे उष्माघाताचा धोका, खबरदारी घ्या, नाही तर येईल चक्कर
पिंपरी : शहरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. योग्य काळजी घेतल्यास उष्माघातासारख्या गंभीर आजारापासून बचाव करता येऊन शकतो, असे वैद्यकीय विभागाने म्हटले आहे.
यंदा पिंपरी-चिंचवड परिसरात कडक उन्हाळा जाणवत आहे. शरीराचे तापमान अत्यंत वाढल्यास चक्कर येणे, अशक्तपणा, उलट्या, डोकेदुखी, गोंधळ होणे किंवा बेशुद्धावस्था अशी लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी विलंब न करता त्वरित सावलीत जाऊन प्राथमिक उपचार घ्यावेत व जवळच्या महापालिका रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपचार मिळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
मावळात बदलली जीवनशैली
मावळ तालुक्यातील नागरिकांनी वाढत्या उन्हामुळे आपली जीवनशैली बदलली आहे. दिवसाच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळून लोक सकाळी किंवा संध्याकाळी कामे करतात. थंड पेये, पाणी आणि हलका आहार यांना प्राधान्य दिले जात आहे. तसेच, उष्माघात टाळण्यासाठी सावलीत राहणे आणि विश्रांती घेणे वाढले आहे.
उष्माघाताची लक्षणे ओळखा
-अंगात प्रचंड उष्णता जाणवणे
-चक्कर येणे किंवा डोके हलके वाटणे
-मळमळ, उलट्या होणे तीव्र डोकेदुखी
-त्वचा कोरडी व गरम होणे
-गोंधळ, अस्वस्थता किंवा बेशुद्धावस्था
उष्माघात टाळण्यासाठी ही काळजी घ्यावी
दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे
भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ सेवन करावे
डोक्यावर टोपी, छत्री किंवा कापड वापरावे
सैल व हलक्या रंगाचे सुती कपडे परिधान करावेत
उपाशीपोटी बाहेर पडू नये
थकवा जाणवल्यास त्वरित सावलीत विश्रांती घ्यावी
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. संभाव्य उष्माघाताच्या घटनांचा विचार करून महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा आणि वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. - डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका