Gautami Patil: गौतमीने साधा मेसेजही केला नाही; कुटुंबीयांचा आरोप, आंदोलनानंतर नेमला विशेष तपास अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 10:10 IST2025-10-04T10:08:58+5:302025-10-04T10:10:49+5:30
Gautami Patil Car Accident: रिक्षाचालक आता व्हेंटिलेटर असून एवढा मोठा अपघात झाला असतानाही गौतमी पाटील हिच्या टीमकडून कोणतीही चौकशी करण्यात आली नाही

Gautami Patil: गौतमीने साधा मेसेजही केला नाही; कुटुंबीयांचा आरोप, आंदोलनानंतर नेमला विशेष तपास अधिकारी
पुणे : पुण्यात नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनाने ३० सप्टेंबर रोजी एका रिक्षाला वडगाव पुलाजवळ मागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये रिक्षाचालक मरगळे हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात रिक्षात बसलेले इतर दोघेही जखमी झाल्याची माहिती आहे. ते सध्या आता व्हेंटिलेटर असल्याची माहिती समोर आली आहे. एवढा मोठा अपघात झाला असतानाही गौतमी पाटील हिच्या टीमकडून कोणतीही चौकशी करण्यात आली नाही, किंवा साधा एक मेसेजही आला नाही असा आरोप रिक्षा चालकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत पोलिसही सहकार्य करत नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता.
काल रात्री मरगळे कुटुंबीयांच्या नातेवाईक आणि इतर लोकांनी सिंहगड पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी या तपासासाठी विशेष तपास अधिकारी नेमला आहे. गौतमी पाटील हिच्या कार चालकाची चूक असताना हा अपघात झाला. मात्र या संपूर्ण प्रकरणाची गौतमी पाटीलच्या टीमकडून दखल घेण्यात आली नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. तसेच पोलिसांकडून सीसीटीव्ही उपलब्ध होत नाही, पोलीस योग्य ते सहकार्य करत नाहीत असा आरोप आता रिक्षाचालक मरगळे यांच्या कुटुंबीयांनी केला होता. अखेर पोलिसांना आता जाग आली असून त्यांनी या अपघाताच्या तपासासाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.
दोषींवर कठोर कारवाई करा
नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघातात प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिली आहे. याप्रकरणी शुक्रवारी मरगळे कुटुंबीयाने चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात भेट घेऊन मदतीची मागणी केली. त्यावर पाटील यांनी डीसीपी संभाजी पाटील यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून दोषींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश दिले.