पुण्यातील पालखी मुक्काम हलवण्याची चर्चा; स्थळांची महापौर व आयुक्तांकडून पाहणी, प्रशासन ॲक्शन मोडवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 10:35 IST2026-04-22T10:35:05+5:302026-04-22T10:35:13+5:30
महापालिकेने अतिक्रमण हटविणे आणि रस्ते रुंदीकरणाची मोठी मोहीम हाती घेतली असून दोन महिन्यांत भवानी पेठ परिसर चकाचक करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे

पुण्यातील पालखी मुक्काम हलवण्याची चर्चा; स्थळांची महापौर व आयुक्तांकडून पाहणी, प्रशासन ॲक्शन मोडवर
पुणे: पुढील दोन महिन्यांत भवानी पेठ परिसर चकाचक करण्याचे लक्ष्य प्रशासनाने निश्चित केले आहे. याच पार्श्वभूमीवर महापौर मंजूषा नागपुरे आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
भवानी पेठेतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मुक्कामाच्या ठिकाणी जागा अपुरी पडत असल्याने हा ऐतिहासिक मुक्काम शहरात अन्यत्र हलविण्याची चर्चा रंगताच पुणेकरांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. शेकडो वर्षांची परंपरा धोक्यात येते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मंजूषा नागपुरे, आमदार हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, तसेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली. महापालिकेने तातडीने हालचाली सुरू करत अतिक्रमण हटविणे आणि रस्ते रुंदीकरणाची मोठी मोहीम हाती घेतली आहे. पुढील दोन महिन्यांत भवानी पेठ परिसर चकाचक करण्याचे लक्ष्य प्रशासनाने निश्चित केले आहे. तसेच पालखी मार्गावरील रस्ते तातडीने दुरुस्त करणे, विद्युत अडथळा ठरणारे खांब हलविणे, सीसीटीव्ही बसविणे, २४ तास कार्यरत वैद्यकीय पथके नियुक्त करणे, नियोजनबद्ध शौचालये व परिसर स्वच्छ ठेवणे, अशा सूचना विविध विभागांना देण्यात आल्या.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मुक्काम स्थळांच्या उन्नतीसाठी तब्बल १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. या निधीतून स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, फिरती शौचालये व स्वच्छता सुविधा उपलब्ध करणे, रस्त्यांची दुरुस्ती व खड्डे बुजविणे, सांडपाणी व्यवस्थापन सुधारणा करणे, ही सर्व कामे दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहेत.