Pune Nasrapur Case: आरोपीला या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली का? नसरापूर अत्याचारप्रकरणी तपास पथकाची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:46 IST2026-05-04T11:45:23+5:302026-05-04T11:46:35+5:30
Pune Nasrapur Girl Murder Case: नसरापूर अत्याचार प्रकरण संवेदनशील असून ग्रामीण पोलिसांकडून तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात सहा अधिकारी असणार आहेत.

Pune Nasrapur Case: आरोपीला या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली का? नसरापूर अत्याचारप्रकरणी तपास पथकाची स्थापना
पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या तपास पथकात सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १) उघडकीस आली. या घटनेनंतर नसरापूरसह पुण्यात संतप्त पडसाद उमटले. या प्रकरणी भीमराव कांबळे या ६५ वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात खून, बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. त्याच्याविरुद्ध १९९८ आणि २०२५ मध्ये विनयभंग आणि बालकावर अत्याचार प्रकरणात (पोक्सो) गुन्हा दाखल झाला होता.
शनिवारी सायंकाळी मुंबई-बंगळुरू महामार्गावर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक चार तास ठप्प झाली होती. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिक आणि पीडित बालिकेच्या कुटुंबीयांनी केली होती. या घटनेनंतर पोलिसआयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडित बालिकेच्या कुटुंबीयांशी संवाद साधून या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांकडून सर्व प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
‘नसरापूर अत्याचार प्रकरण संवेदनशील आहे. ग्रामीण पोलिसांकडून तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात सहा अधिकारी असणार आहेत. त्यात दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. सहा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकातील कर्मचारी तपास करणार आहेत’, असे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी सांगितले.
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडी दरम्यान आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची आहे. रासायनिक विश्लेषण तपासणी, तसेच लैंगिक सक्षमतेची चाचणी करायची आहे. आरोपीने पीडित मुलीवर यापूर्वी अत्याचार केले आहेत का, तसेच अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का, या दृष्टीने तपास करायचा आहे. बालिकेला घेऊन जाताना आरोपीला साक्षीदारांनी पाहिले आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत. आरोपीने बालिकेचा खून करण्यासाठी कोणते शस्त्र वापरले, आरोपीला या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली का ? अशा मुद्द्यांवर पोलिसांकडून तपास करण्यात येणार आहे.