चिमुरडा मोठ्याने रडल्याने खून केल्याचे तपासात उघड; घर मालकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 14:30 IST2026-05-05T14:29:36+5:302026-05-05T14:30:36+5:30
Crime News : तीन वर्षीय चिमुरडा खेळत असताना एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याला खोलीत घेतले.

चिमुरडा मोठ्याने रडल्याने खून केल्याचे तपासात उघड; घर मालकावर गुन्हा दाखल
पिंपरी : तीन वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून खून केल्याच्या प्रकरणातील संशयित अल्पवयीन मुलाच्या घर मालकावर पोलिसांनी तीन दिवसांनी सोमवारी (दि. ४) गुन्हा दाखल केला आहे. खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसीतील खालुंब्रे येथे शुक्रवारी रोजी ही घटना घडली होती.
सर्जेराव बबन बोत्रे (वय ६०, रा. खालुंब्रे) याच्या विरोधात दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अंमलदार अर्जुन भास्कर कराड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३चे कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खालुंब्रे येथे १ मे रोजी तीन वर्षीय चिमुरडा खेळत असताना एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याला खोलीत घेतले. अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून चिमुरड्याचा खून केला. त्यानंतर १६ वर्षीय मुलगा पसार झाला. पोलिसांनी २ मे रोजी पुणे रेल्वेस्थानकावरून त्याला ताब्यात घेतले.
भाडेकराराबाबत पोलिसांना माहिती न दिल्याचे उघड
दरम्यान, हा संशयित १६ वर्षीय मुलगा सर्जेराव बोत्रे याच्या खोलीमध्ये भाडेतत्त्वावर राहत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तसेच बोत्रे याने त्याच्या मालकीच्या पाच खोल्यांमध्ये सहा महिन्यांपासून भाडेकरू ठेवले असून, भाडेकरार करून त्याबाबत पोलिसांना माहिती दिली नाही. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३चे कलम १६३ अन्वये दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे बोत्रे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोणाला काही सांगू नये म्हणून केला खून
संशयित १६ वर्षीय मुलगा १ मे रोजी नशेत होता. त्यावेळी दुपारी त्याने तीन वर्षीय चिमुरड्याला खोलीत घेऊन अत्याचार केला. त्यावेळी चिमुरडा मोठ्याने रडू लागल्याने संशयित १६ वर्षीय मुलगा घाबरला. चिमुरडा या प्रकाराबाबत कोणालाही सांगू शकतो, असे वाटले. त्यामुळे रडणाऱ्या चिमुरड्याचे ताेंड दाबत गळ्यावर वार करून त्याचा खून केला, असे १६ वर्षीय संशयित मुलाने चौकशीत पोलिसांना सांगितले.