Crime News : व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर सामूहिक अत्याचार; चौघांना २० वर्षे सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 19:39 IST2026-05-08T19:39:12+5:302026-05-08T19:39:59+5:30
Crime News : दंड न भरल्यास आरोपींना १ वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

Crime News : व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर सामूहिक अत्याचार; चौघांना २० वर्षे सक्तमजुरी
पुणे : शारीरिक संबंधाचे व्हिडीओ काढून, ते व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चौघांना २० वर्षे सक्तमजुरी आणि ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. भोसले यांनी सुनावली. दंड भरल्यास दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी. दंड न भरल्यास आरोपींना १ वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
पीडित २० वर्षीय फिर्यादीची साक्ष, वैद्यकीय पुरावा आणि चार आरोपींसह एका अल्पवयीन आरोपींनी पीडितेच्या मोबाइलवर केलेले ३९८ कॉल हा पुरावा महत्त्वाचा ठरला. नोमान ऊर्फ अरबाज जावेद शेख (वय १९), रियाज ऊर्फ मन्नान जावेद शेख (वय २०), सोहेल शेरअली पिरजादे (वय २१) आणि सुलतान ऊर्फ मुस्ताक सलीम सय्यद (वय ३२ चौघेही, रा, देहूरोड, ता. हवेली) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात विशेष सरकारी वकील विजय पाटील यांनी २२ साक्षीदार तपासले. त्यामध्ये देहूरोड येथे जानेवारी ते ३१ मे २०२१ या कालावधीत ही घटना घडली.
फिर्यादी आणि नोमान याचे शारीरिक संबंध होते. दोघे संबंध करतानाची व्हिडीओ क्लिप मुस्ताक याने काढली. ही क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास करून देहूरोड पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सामूहिक बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, ॲट्राॅसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता. ॲट्राॅसिटीमधून निर्दोष मुक्तता झाली आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपींना अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील विजय पाटील यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला.