राहू : दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील भीमा नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याचे पाणी, जनावरांच्या पाण्याची सोय आणि शेतीसाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याअभावी उसासह हिरवीगार पिके जळून जाण्याच्या मार्गावर असून, धरणातून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
भीमा नदीच्या पाण्यावर दौंड आणि शिरूर तालुक्यातील पेरणे, पिंपरी सांडस, विठ्ठलवाडी, पाटेठाण, मेमाणवाडी, टाकळी भीमा, अरणगाव, पानवली, वडगाव बांडे, कोरेगाव भिवर, आलेगाव पागा आदी गावांतील शेती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. मात्र, पाटेठाण परिसरात नदीची पाणीपातळी पूर्णपणे तळाला गेली असून, कृषिपंप नदीच्या मध्यभागी नेऊनही पाणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.
पाण्याअभावी परिसरातील उभी पिके करपू लागली आहेत. काही ठिकाणी नदीच्या खोलगट भागात उरलेल्या पाण्याचा वापर करून शेतकरी पिके वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नदीतील पाणीसाठा संपल्याने परिसरातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारेही कोरडे पडले आहेत. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. भामा आसखेड धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यातून तातडीने आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी करत आहेत.
“गेल्या दहा दिवसांपासून नदीत पाणी नसल्याने कृषी विद्युत पंप बंद आहेत. त्यामुळे उसासारखी हिरवीगार पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, याला जबाबदार कोण?” - संतोष शिंदे, शेतकरी, पाटेठाण
Web Summary : Drought threatens Daund as the Bhima River dries up, impacting drinking water, livestock, and agriculture. Farmers urgently request water release from dams to save crops.
Web Summary : भीमा नदी सूखने से दौंड में सूखे का खतरा मंडरा रहा है, जिससे पीने के पानी, पशुधन और कृषि पर असर पड़ रहा है। किसान फसलों को बचाने के लिए बांधों से तत्काल पानी छोड़ने का अनुरोध कर रहे हैं।