Pune Water Cut News: उकाड्याने आधीच परेशान, त्यात पाण्याअभावी पुणेकर हैराण, गुरुवारी पाणी बंद; शुक्रवारीही दुपारपर्यंत नळ कोरडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 10:45 IST2026-04-25T10:44:20+5:302026-04-25T10:45:42+5:30

Pune Water Cut News काही ठिकाणी तर दुपारनंतरही अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी पुणेकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला

Already troubled by the heat, Pune residents are worried about the lack of water, water supply will be cut off on Thursday; taps will be dry till Friday afternoon as well | Pune Water Cut News: उकाड्याने आधीच परेशान, त्यात पाण्याअभावी पुणेकर हैराण, गुरुवारी पाणी बंद; शुक्रवारीही दुपारपर्यंत नळ कोरडे

Pune Water Cut News: उकाड्याने आधीच परेशान, त्यात पाण्याअभावी पुणेकर हैराण, गुरुवारी पाणी बंद; शुक्रवारीही दुपारपर्यंत नळ कोरडे

पुणे: महापालिकेच्या विविध जलकेंद्र आणि जलवाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी गुरुवारी (दि.२३) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते; पण पर्वती, लष्कर आणि वडगाव जलकेंद्र परिसरातील देखभाल दुरुस्तीच्या कामात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे दुरुस्तीचे काम लांबणीवर पडले. त्याने शहराच्या बहुतांश भागांत शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत नळ कोरडे होते. शहराच्या बहुतांश भागांत दुपारनंतर कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. पुणे महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाणीबाणी निर्माण होऊन पुणेकरांचे अतोनात हाल झाले.

शहरातील पर्वती, लष्कर, वडगाव, वारजे आणि नवीन होळकर पम्पिंग स्टेशन येथे अत्यावश्यक देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद ठेवला होता. या बंदच्या कालावधीत ४५ महत्त्वाची देखभाल- दुरुस्तीची कामे करण्याचे नियोजन केले होते. त्यात गेल्या ५ वर्षांपासून नादुरुस्त असलेला वारजे जलवाहिनीचा मुख्य ‘व्हॉल्व्ह’ आणि खडकवासला धरणावरून येणाऱ्या जलवाहिनीवरील ‘व्हॉल्व्ह’ बदलण्यात आला. अनेक जलकेंद्रांवर विद्युत कामे करण्यात आली.

त्यानुसार ही कामे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते; पण पर्वती येथील कामात कालव्याच्या गळतीमुळे अडथळा आला. त्यामुळे शुकवारी साधारणपणे दुपारी १२:०० वाजेपर्यंत हे काम सुरू होते. त्यामुळे शुक्रवारी दुपारी ३:०० वाजेपर्यंत अनेक भागांत पाणीपुरवठा होऊ शकला नाही. काही ठिकाणी तर दुपारनंतरही अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी पुणेकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. जलवाहिन्यांमध्ये हवेचा दाब निर्माण झाल्यामुळे (एअर लॉक) उंचावर असलेल्या भागांत पाणी पोहोचण्यास अधिक वेळ लागला.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागासह शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ, रविवार पेठ, रास्ता पेठ आणि कसबा पेठ, कोथरूड, कर्वेनगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, दत्तवाडी, सहकारनगर आणि पर्वती परिसर, सिंहगड रस्ता, धायरी, वडगाव बुद्रुक, हडपसरचा काही भाग आणि लष्कर, कात्रज, कोंढवा, भारती विद्यापीठ परिसर, सुखसागरनगर, साईनगर, गोकुळनगर, टिळेकरनगर, येवलेवाडी, लक्ष्मीनगर, पानसरेनगर, गुजरनिंबळकरवाडी, मांगडेवाडी आणि भिलारेवाडी या परिसरला सर्वाधिक पाणी न आल्याचा फटका बसला. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले.

कोथरूड, एरंडवणा, येरवडामध्ये आले सायंकाळी पाणी

कोथरूड, एरंडवणा, येरवडा या भागाला शुक्रवारी सायकांळी पाणीपुरवठा सुरू झाला. त्यामुळे या भागातील नागरिकांचे पाण्याअभावी सर्वाधिक हाल झाले.

खाजगी टॅकरचालकांची मनमानी, जादा पैसे मोजावे लागले

शहरात सलग दुसऱ्या दिवशी पाणी न आल्यामुळे अनेकांनी सकाळीच पाण्याचे टँकर मागविण्यासाठी प्रयत्न केला. पालिकेचे टँकर पाॅइंट पाण्याअभावी बंद होते. त्यामुळे खाजगी टँकर चालकांनी मनमानी करून नागरिकांकडून टँकरसाठी जादा दर आकारण्याचे प्रकार काही ठिकाणी घडले. अचानक वाढलेल्या मागणीमुळे टँकरही उशिरा मिळाले. काही ठिकाणी टँकरसाठी नागरिकांची धावपळ उडाली.

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचीच गैरसोय

घरात पाणी नसल्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचीच गैरसोय झाली. विशेषतः नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली. ऑफिस आणि काॅलेजला जाण्याची वेळ जवळ आली तरी पाणी उपलब्ध नसल्याने अनेकांचे वेळापत्रक कोलमडले. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सकाळपासून नागरिकांच्या फोनचा अक्षरशः भडिमार सहन करावा लागला. गुरुवारी पाणी येणार नाही, हे ठाऊक असल्याने आम्ही साठा केला होता; पण शुक्रवारी सकाळीही पाणी न आल्याने मोठे हाल झाले. मुलांचे शाळेचे डबे आणि घरची कामे वेळेवर होऊ शकली नाहीत, अशी भावना गृहिणींनी व्यक्त केली.

पाण्याअभावी अर्धा दिवस शाळा बंद

कात्रज येथील पाण्याच्या तीव्र पाणीटंचाईमुळे तातडीची सूचना देत अर्धा दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय एका खाजगी शाळेने घेतला. पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याने आणि टँकर उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना दुपारी १२:०० वाजता घरी पाठविण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले.

ससून रुग्णालयालाही फटका

ससून सर्वोपचार रुग्णालयासह बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयासही शुक्रवारी पाणी न मिळाल्याने फटका बसला. शस्त्रक्रिया विभागासह वॉर्डातील स्वच्छतागृहांत पाणीटंचाईचा सामना करावा लागला. महाविद्यालयातील कॅन्टीन सेवाही विस्कळीत झाली होती.

Web Title : पुणे में जल संकट: गर्मी ने आपूर्ति व्यवधान को और बढ़ाया

Web Summary : रखरखाव में देरी के कारण पुणे में गंभीर जल संकट। कई क्षेत्रों में पानी की आपूर्ति बाधित, जिससे भारी कठिनाई हुई। अस्पताल और स्कूल प्रभावित, जिसके कारण ऑपरेशन रद्द और जल्दी बंद हुए। निजी टैंकर ऑपरेटरों ने स्थिति का फायदा उठाया, और अधिक दरें वसूलीं।

Web Title : Pune Faces Water Crisis: Heat Exacerbates Supply Disruption Woes

Web Summary : Pune faced a severe water crisis due to maintenance delays. Many areas experienced dry taps, causing immense hardship. Hospitals and schools were affected, leading to cancelled operations and early closures. Private tanker operators exploited the situation, charging exorbitant rates.