वरिष्ठ अधिकाऱ्याने टिप दिल्याने आरएमसी प्लांटवर कारवाई थांबली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 17:03 IST2026-04-18T17:02:49+5:302026-04-18T17:03:00+5:30
पुणे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या कारवाईची टिप वडगाव धायरी येथील आरएमसी प्लांटचालकांना दिली.

वरिष्ठ अधिकाऱ्याने टिप दिल्याने आरएमसी प्लांटवर कारवाई थांबली
पुणे : लोहगाव खांदवेनगर, महालक्ष्मी लॉन्स परिसरातील सात अनधिकृत आरएमसी प्लांट जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर कारवाई केल्यानंतर वडगाव, धायरी भागातील नऊ प्लांटवर पुणे महापालिका कारवाई करणार होती. पण पुणे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या कारवाईची टिप वडगाव धायरी येथील आरएमसी प्लांटचालकांना दिली. त्यामुळे पालिका प्रशासनावर राजकीय दबाव आणून ही कारवाई थांबविण्यात आली.
शहरातील नागरीवस्तीतील आरएमसी प्रकल्पाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणाला नागरिकांना सातत्याने सामोरे जावे लागत आहे. त्यानुसार पालिकेने लोहगाव येथे कारवाई केली. त्यानंतर बांधकाम विभागाने वडगाव व धायरीतील प्लांटची यादी अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे पाठवून कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला. त्यानुसार पहाटे कारवाई करण्याचे नियोजन तयार केले होते.
ही फाईल विविध अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवली जात असतानाएका अधिकाऱ्याने या कारवाईची टीप प्लांट चालकांना दिली. त्यानंतर ही कारवाई थांबविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून राजकीय दबाव आणण्यात आला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात अतिक्रमण निर्मूलन विभागाला कारवाई करू नका आदेश देण्यात आले.
लोहगावची कारवाई करण्याचे आदेश मी दिले होते. पण वडगाव, धायरी येथे कारवाई होणार होती याची मला माहिती नव्हती. त्यामुळे ती का झाली नाही हे मी सांगू शकत नाही. आरएमसी प्लांट बेकायदा असतील त्यावर कारवाईच होणार. - नवल किशोर राम, महापालिका आयुक्त
शहरात आरएमसी प्लांटवर कारवाई करण्याचे आदेश मिळालेले होते. वडगाव धायरी येथील आरएमसी प्लांटवर कारवाईचे नियोजन सुरू असताना मला अचानक कारवाई करू नये असे आदेश आले. त्यामुळे कारवाई रद्द करण्यात आली.- सोमनाथ बनकर, उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग