Pimpari-chinchwad: वाकड, पिंपळे सौदागरमध्ये घर घेताय? सोसायटीत पाणी मिळतेय का तपासा ..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 14:53 IST2026-04-18T14:53:19+5:302026-04-18T14:53:43+5:30
- टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, पण रहिवाशांना पाण्यासाठी त्रास : अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा; टँकरचे पाणी विकत घ्यावे लागण्याची वेळ; दरवर्षीचा भुर्दंड वाढला

Pimpari-chinchwad: वाकड, पिंपळे सौदागरमध्ये घर घेताय? सोसायटीत पाणी मिळतेय का तपासा ..!
वाकड : हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यात नोकरी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, त्यातील बहुसंख्य आयटीयन्स जवळच्या परिसरातच राहण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे आयटीनगरीस लागून असलेल्या वाकड, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. अनेक नवीन इमारतींची कामे सुरू आहेत, मात्र या परिसरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
हिंजवडी आयटी हब जवळ असल्यामुळे वाकड, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर या भागातील घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मात्र या परिसराला पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय नसल्यामुळे नवीन घर घेणाऱ्यांना फटका बसत आहे. परिसरात निर्माण होत असलेल्या मोठमोठ्या रहिवासी इमारतींना कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होतो. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी जार तसेच वापराच्या पाण्यासाठी सोसायट्यांना टँकर विकत घ्यावे लागत आहेत.
स्वतःचे घर असूनही या रहिवाशांना लाखो रुपयांचा खर्च पिण्याच्या पाण्यासाठी करावा लागत आहे. या परिसरातील काही विकासक स्वखर्चातून रहिवाशांना पाणीपुरवठा करतात, तर काही विकसक नवीन घर खरेदी करणाऱ्यांची दिशाभूल करतात. त्यामुळे वाकड, पिंपळे निलख, पिंपळे सौदागरला घर घेण्याआधी सोसायट्यांमध्ये पुरेसे पाणी मिळतेय का तपासून पहा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
पाणी पिण्यास योग्य आहे की नाही? कोण तपासणार?
सोसायट्यांमध्ये टँकरच्या माध्यमातून पुरवले जाणारे पाणी पिण्यास योग्य नसल्यामुळे येथील रहिवाशांना अनेक गंभीर आजाराचा त्रास सहन करावा लागत आहे. या पाण्याची कोणतीही तपासणी होत नसल्याचे दिसून येत आहे.
पिण्याचे पाणी दोन दिवसांतून एकदा येते. मात्र ते कमी दाबाने येत असल्यामुळे रहिवाशांना अपुरे पडते. यामुळे आम्हाला दररोज पाण्यासाठी टँकर मागवावा लागतो. याचा त्रास आर्थिक स्वरूपात सहन करावा लागतो. - साईनाथ चित्ते, रहिवासी, यशदा ट्रायस, पिंपळे सौदागर
गेल्या अनेक वर्षांपासून वाकड परिसरात पिण्याचे पाणी कमी दाबाने येत असून ते अपुरे पडते. यामुळे दररोज सोसायटीसाठी बाहेरून आठ ते दहा टँकर मागवावे लागत आहेत. वाकड परिसरात रहिवासी संख्या वाढत आहे, मात्र पाणीपुरवठा अपुरा पडतो. - सोमनाथ धोंडे, रहिवासी, वेदांत सोसायटी, वाकड
पिंपळे निलख परिसरातील पाणीटंचाई नैसर्गिक नसून कृत्रिम आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवून टँकरमाफियांना याचा फायदा करून दिला जातो. प्रशासनाने हस्तक्षेप करून पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा रस्त्यावर उतरून हंडा मोर्चा काढू. - तुषार कामटेठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार)