पवना नदीवरील ब्राम्हणोली पूल अरुंद असल्यामुळे वाहतुकीला होतोय अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:04 IST2026-05-05T15:04:08+5:302026-05-05T15:04:46+5:30
- दोन चारचाकी वाहने एकावेळी जाण्यास येते अडचण, वाहनचालकांना सावधगिरीने करावा लागतो प्रवास; अपघाताच्या घटना घडूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांकडून आरोप

पवना नदीवरील ब्राम्हणोली पूल अरुंद असल्यामुळे वाहतुकीला होतोय अडथळा
पवनानगर : मावळ तालुक्यातील पवनमावळ भागातील पवना नदीवरील ब्राम्हणोली येथील पूल अरुंद असल्याने नागरिकांकडून रुंदीकरणाची मागणी वाढत आहे. पुलाच्या सध्याच्या स्थितीमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित पवनमावळ परिसरातील गावांसाठी तो महत्त्वाचा दळणवळणाचा असून, अनेक मार्ग आहे. मात्र पुलाची रुंदी कमी असल्याने दोन चारचाकी वाहने एकाच वेळी जाण्यास अडचण येते. त्यामुळे वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागतो.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या पुलावर अपघातांच्या घटना घडल्याचे ही निदर्शनास आले आहे. तरीही पुलाच्या सुधारणा किंवा रुंदीकरणाबाबत अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
पावसाळ्यापूर्वी रुंदीकरण करा
सध्याच्या पुलामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांची ओलांडताना अडचण होत असल्याची तक्रार आहे. वाहतुकीदरम्यान वारंवार कोंडी होत असून अपघाताचा धोका वाढल्याची नागरिकांची भावना आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. पुलाचे लवकरात लवकर रुंदीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
'ब्राम्हणोली पूल आमच्या भागासाठी महत्त्वाचा आहे. मात्र त्याची सध्याची अवस्था लक्षात घेता रुंदीकरणाची आवश्यकता आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. - नारायण बोडके, सरपंच, ठाकूरसाई-खडक गेव्हंडे समूह ग्रामपंचायत
दररोज या पुलावरून प्रवास करताना अडचणी येतात. दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहन चालवणे कठीण होते. त्यामुळे पुलाचे रुंदीकरण व्हावे. - अतुल कालेकर, स्थानिक नागरिक
या पुलावर वाहतुकीची वर्दळ असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. - आनंता खैरे, पोलिस पाटील, तिकोणा
हा पूल अनेक गावांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे वाहतुकीस सुलभता यावी यासाठी पुलाच्या रुंदीकरणाचा विचार होणे आवश्यक आहे. - संजय वर्वे, माजी उपसरपंच, तिकोणा
ब्राम्हणोली पुलाचे रुंदीकरण त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. - स्वप्नील तुपे, माजी उपसरपंच, तिकोणा ग्रामपंचायत