पवना नदीत पोहण्यासाठी उतरले अन् काळाने घातला घाला; पुण्यातील तिघा तरुणांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 15:33 IST2026-05-03T15:33:02+5:302026-05-03T15:33:33+5:30
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक नदी, धरण आणि पर्यटनस्थळी भेट देत असतात.

पवना नदीत पोहण्यासाठी उतरले अन् काळाने घातला घाला; पुण्यातील तिघा तरुणांचा बुडून मृत्यू
पवनानगर - मावळ तालुक्यातील थुगाव गावाजवळील पवना नदीत रविवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत पुण्यातील तिघा तरुणांचा बुडून मृत्यू झाला. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या मित्रांवर काळाने घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये प्रथमेश शिंदे, अश्विन भालेराव आणि आयान शेख (सर्व रा. पुणे) यांचा समावेश आहे. ही घटना रविवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
अधिकच्या माहितीनुसार, संबंधित तरुण सुट्टीचा दिवस असल्याने मावळ परिसरात फिरण्यासाठी आले होते. थुगाव गावाच्या हद्दीत असलेल्या पवना नदी पात्रात ते पोहण्यासाठी उतरले. मात्र नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर तिघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. घटनेनंतर तिघांना तात्काळ कामशेत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद वडगाव मावळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक नदी, धरण आणि पर्यटनस्थळी भेट देत असतात. अशा ठिकाणी पाण्यात उतरताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि धोकादायक भागात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.