Crime News: पिंपरीत हॉटेलमध्ये ऑर्डरवरून वाद; ग्राहकावर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 17:56 IST2026-05-05T17:56:24+5:302026-05-05T17:56:35+5:30
- एकाने हातातील झारा हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Crime News: पिंपरीत हॉटेलमध्ये ऑर्डरवरून वाद; ग्राहकावर जीवघेणा हल्ला
पिंपरी - पिंपरीतील साई चौक परिसरात एका हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर घेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून झालेला वाद हिंसक वळणावर गेला. या घटनेत एका ग्राहकावर झाऱ्याने आणि इतर वस्तूंनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (४ मे) मध्यरात्रीनंतर सुमारे दोनच्या सुमारास घडली. अशिष जगन्नाथ वाळुंज (वय ३०, रा. नेहरुनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अब्बास असादून शेख (वय ३०), मोहंमद अजिज आशान शेख (वय २१) आणि पंकज ऊर्फ बंटी शंकर भुमकर (वय ३०) यांना अटक केली आहे. तिघेही पिंपरी परिसरातील रहिवासी आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र रात्री उशिरा हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी हॉटेल बंद झाल्याचे वेटरने मोठ्या आवाजात सांगितले. यानंतर फिर्यादीने वेटरला शांतपणे बोलण्यास सांगितल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.
वाद वाढल्यानंतर संशयितांनी स्वयंपाकघरातील झारा आणि इतर वस्तूंचा वापर करून फिर्यादीवर हल्ला केला. या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाले. तसेच आरोपींपैकी एकाने हातातील झारा हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केल्याचेही पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पिंपरी पोलिस पुढील तपास करत आहेत.