जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 20:19 IST2025-06-09T19:55:02+5:302025-06-09T20:19:22+5:30
एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीला भारतात उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पुरवण्याची परवानगी मिळाली आहे.

सध्या इंटरनेट शिवाय काहीच चालत नाही. यामुळे अनेकजण जास्त स्पीडने चालणारे इंटरनेट कनेक्शन घेत आहेत. सध्या देशात जिओ, एअरटेल, बीएसएनएल या कंपन्या इंटरनेट पुरवतात. आता आणखी एक विदेशी कंपनी भारतात इंटरनेटची सुविधा पुरवणार आहे. ही कंपनी थेट सॅटेलाईटवरुन इंटरनेट देणार आहे. यामुळे इंटरनेटचे स्पीडही वाढणार आहे.
अमेरिकेचे उद्योगपती एलॉन मस्क यांच्या सॅटेलाइट इंटरनेट कंपनी स्टारलिंक आता भारतात आपले व्यावसायिक कामकाज सुरू करण्याची तयारी करत आहे. काही दिवसापूर्वीच स्टारलिंकला भारतीय दूरसंचार विभाग (DoT) कडून आवश्यक परवाना मिळाला आहे.
यामुळे कंपनीला देशात उपग्रह-आधारित इंटरनेट सेवा प्रदान करण्याची परवानगी मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टारलिंक भारतात अमर्यादित डेटा प्लॅन लाँच करणार आहे, याची किंमत दरमहा ३,००० रुपयांपासून सुरू होऊ शकते.
ग्राहकांना ३३,००० रुपयांचा एक-वेळ हार्डवेअर शुल्क देखील भरावा लागेल. बांगलादेशप्रमाणेच भारतातही अशाच योजना लागू केल्या जातील, असा अंदाज लावला जात आहे.
स्टारलिंक ही एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स द्वारे चालवली जाणारी एक उपग्रह इंटरनेट सेवा आहे. ही लो अर्थ ऑर्बिट (LEO) मधील हजारो उपग्रहांद्वारे जलद आणि स्थिर इंटरनेट कनेक्टिव्हिटी देते.
या सेवेचा उद्देश ब्रॉडबँड सेवा उपलब्ध नसलेल्या गावांमध्ये आणि दुर्गम भागात देखील हाय-स्पीड इंटरनेट देणे आहे. या सेवेसाठी, वापरकर्त्यांना त्यांच्या घरात किंवा ऑफिसमध्ये रिसीव्हर सेट करावा लागेल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळवण्यास सुरुवात करावी लागेल.
आतापर्यंत स्टारलिंकला भारतात इंटरनेट सेवा देण्याची परवानगी नव्हती, पण आता त्यांना दूरसंचार विभागाकडून (DoT) आवश्यक परवाना मिळाला आहे. भारतात परवानगी मिळवणारी ही तिसरी सॅटेलाइट इंटरनेट कंपनी आहे. यापूर्वी भारती एअरटेलच्या वनवेब आणि रिलायन्स जिओला सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्याची परवानगी मिळाली आहे.
स्टारलिंकला अजून IN-SPACE कडून अंतिम परवानगी मिळालेली नाही. तसेच, भारतात काम सुरू करण्यापूर्वी कंपनीला स्पेक्ट्रम वाटप आणि ग्राउंड इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावे लागेल.
मासिक सबस्क्रिप्शन फी: ३,००० रुपये (अमर्यादित डेटा) तसेच एक-वेळ हार्डवेअर फी: ३३,००० रुपये (स्टारलिंक डेटा रिसीव्हर किट)
हे मॉडेल बांगलादेशमध्ये अलीकडेच लाँच झालेल्या स्टारलिंक सेवांसारखेच आहे, तिथे सेवा याच किमतीत दिल्या जात आहेत.