निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 23:35 IST2026-05-17T23:34:06+5:302026-05-17T23:35:17+5:30
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर एसटी खोल खड्ड्यात कोसळल्याने दोघांचा मृत्यू, २० प्रवासी जखमी

निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
Pune St Bus Accident: लोकमत न्यूज नेटवर्क, वडगाव आनंद: कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी पाचच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि थरारक अपघात घडला. बेल्हे जवळील गुंजाळवाडी परिसरात प्रवाशांनी गच्च भरलेली भिवंडी डेपोची एसटी अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याशेजारील खोल खड्ड्यात कोसळली. हा अपघात इतका भयानक होता की बसचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून, एसटी चालकाचा जागीच चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला आहे. चालकासह अन्य एका प्रवाशाचाही या दुर्घटनेत जागीच प्राण गेला आहे. सदर बसमध्ये २९ च्या आसपास प्रवासी प्रवास करत असल्याचा अंदाज आहे.
नियतीनेच राखलं मातृत्व! ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघातात बसचा अक्षरशः चक्काचूर झाला असतानाच, निसर्गाचा एक मोठा चमत्कारही पाहायला मिळाला. या बसमध्ये एक ६ महिन्यांची गरोदर महिला प्रवास करत होती. अपघाताची भीषणता पाहता मोठी दुर्घटना घडण्याची भीती होती. पण ही गरोदर महिला या अपघातातून पूर्णपणे सुखरूप बचावली. 'देव तारी त्याला कोण मारी' या उक्तीचा प्रत्यय यावेळी घटनास्थळी आला असून, या दिलासादायक वृत्तामुळे सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला आहे.
दोन जणांचा मृत्यू
मिळालेली माहिती अशी की, सदर बस (क्र. MH-14 BT-4523) ही भिवंडी डेपोची होती. गुंजाळवाडी परिसरात आल्यानंतर अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले आणि क्षणात बस थेट खोल खड्ड्यात जाऊन कोसळली. अपघात एवढा गतिमान आणि भीषण होता की बसचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला. यात चालक केबिनमध्येच अडकून पडल्याने एसटी चालकाचा जाग्यावरच मृत्यू झाला. मृत चालकाचे पूर्ण नाव मोहंमद सलीम मोहंमद युसूफ (वय ४०, रा. चांदुर बाजार, अमरावती) असे आहे. त्यांच्यासोबत मृत पावलेल्या प्रवाशाचे नाव मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
प्रवासी गाढ झोपेत असताना अपघात
सुटीचा दिवस असल्याने बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. महामार्गावरून प्रवास सुरू असताना बसमधील बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. प्रवासी झोपेत असल्याने आणि सर्व काही सेकंदाच्या आत घडल्याने हा अपघात नेमका कसा आणि कशामुळे झाला, हे गाडीतील कोणालाच समजले नाही. थेट खड्ड्यात आदळल्यानंतर प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला. सुदैवाने, या मोठ्या अपघातातून उर्वरित प्रवासी थोडक्यात बालंबाल बचावले आहेत.
काहींची प्रकृती चिंताजनक
अपघातानंतर आळेफाटा येथील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये जखमींवर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने आणि नातेवाईकांनी तातडीने निर्णय घेतल्याने अनेक जखमींना पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. प्रवासी गंभीर जखमी असल्याने आणि त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आल्यामुळे, गाडीत नेमके एकूण किती प्रवासी होते याची अचूक संख्या अद्याप समजू शकलेली नाहीत.
जखमींची नावे
अपघातातील जखमींमध्ये कोंडीभाऊ कारभारी वाकचौरे (वय ७०, रा. बेल्हे), कमल कोंडीभाऊ वाकचौरे (वय ६७, रा. बेल्हे), अरुण शंकर गुंजाळ (वय ५१, रा. बेल्हे), दिपाली बबन डोंगरे (वय ३३, रा. डोंगरवाडी), शारदा बन्सी मेंगडे (वय ५९, रा. आणे), अश्विनी गणेश बहिरट / बाहिरट (वय ४८, रा. आणे), उल्हास तांबे (वय ७०, रा. ओतूर), अलका नामदेव गायकवाड (वय ५८, रा. संगमनेर), यमुना यादव पावसे (वय ६०, रा. हिवरगाव पावसा, संगमनेर), दिव्या संजय पवार (वय २१, रा. मानवडी, सिन्नर), सिद्धेश नितीन काळे (वय १०, रा. पाथर्डी), आशा नितीन काळे (वय ३५, रा. पाथर्डी), नितीन सिद्धार्थ काळे (वय ३८, रा. पाथर्डी), मगन सुखदेव पाटोळे (वय ४८, रा. बुलढाणा), शोभा मगन पाटोळे (वय ३०, रा. बुलढाणा), शंकर शिवाजी शेजाळ (वय ५०, रा. देवडे, पंढरपूर), वैशाली शंकर शेजाळ (वय २३, रा. देवडे, पंढरपूर), सुंदर संदिप येलमर (वय ४०), मनिषा शिवराम बोहाडे (वय ४०), प्रतिभा विनोद मंडले (वय २६) यांचा समावेश आहे.
घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सर्व प्रवाशांना तातडीने खिडक्या तोडून बाहेर काढण्यात यश आले. पोलीस प्रशासनाकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.