डाएट आणि व्यायाम न करताही वजन होईल कमी, रोज फक्त ५ कामं करा, काही आठवड्यातच पाहा फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2024 03:29 PM2024-05-03T15:29:42+5:302024-05-03T18:10:51+5:30

वाढतं वजन कसं कमी करायचं हा अनेकांपुढचा प्रश्न आहे. वजनावर कंट्रोल करण्यासाठी काही जणं खूप प्रयत्न करतात. तर काहींना मात्र डाएटिंग, जीम या सगळ्या गोष्टींचाच जाम कंटाळा येतो. (how to lose weight at home)

तुमचंही असंच होत असेल पण वजनावर मात्र ताबा ठेवायचा असेल तर तुम्ही काही गोष्टी नियमितपणे करा. या गोष्टींची सवय जर स्वत:ला लावून घेतली तर निश्चितच तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.

यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भरपूर पाणी प्या. भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. याशिवाय सकाळी उठल्यावर १ ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे चयापचय क्रिया उत्तम होते.

जेवणानंतर लगेच कामाला बसू नका. जेवण झाल्यानंतर १० ते १५ मिनिटे का होईना पण थोडं चाला. किंवा उभ्याउभ्या घरातली इतर कामं करा. जेवणानंतर शारिरीक हालचाल झाल्यास कॅलरी बर्न होण्यास तर मदत होतेच, पण रक्तातील वाढलेली ग्लुकोज पातळीही कमी होते.

रात्रीचं जेवण ७ च्या आसपास घ्या. या जेवणात सूप किंवा उकडलेल्या भाज्या असं फायबरयुक्त अन्न जास्त घ्या. यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. रात्रीच्यावेळी मैद्याचे जेवण, तेलकट, तुपकट असे हेवी जेवण करू नका. तसेच बाहेरचं खाणं टाळा. घरचं सात्विक अन्न घेण्यावर भर द्या.

साखर बंद केल्यामुळे किंवा ती खूप कमी प्रमाणात खाल्ल्यानेही वजनात लगेच फरक जाणवतो. एकदम साखर बंद करणं कठीण होतं. त्यामुळे हळूहळू कमी करा. चहा, दूध, कॉफीमध्ये साखर घेऊ नका. तसेच गोड पदार्थही खूप कमी खा.

वजन कमी करायचं असेल तर शारिरीक हालचाल तर व्हायलाच पाहिजे. जर जीममध्ये जायचं नसेल किंवा तेवढा वेळ नसेल तर शक्य तिथे चालत जाण्याचा प्रयत्न करा. लिफ्टचा वापर कमीतकमी करा. किंवा घरातल्या घरात १० मिनिटे तरी योगासनं, सुर्यनमस्कार असं काहीतरी करा.