विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 03:23 PM2024-06-16T15:23:22+5:302024-06-16T15:27:45+5:30

ST Bus pass Student : विद्यार्थ्यांना आता एसटीचे पास (ST Bus Pass)  हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार एसटी महामंडळाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Good news for students! ST bus passenger pass will be available in schools and colleges only | विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास

मुंबई : शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी एसटीने प्रवास करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांना आता एसटीचे पास (ST Bus Pass)  हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार एसटी महामंडळाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे  तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झाल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी सरकारने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६ टक्के इतकी सवलत दिली आहे. याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे त्यांना केवळ ३३ टक्के रक्कम भरून मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. 

यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास काढावा लागतो. तर काही ठिकाणी ग्रुपने एसटी आगारात जाऊन आगार व्यवस्थापनकडून पास घेतले जातात. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत  ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. 

या संदर्भात १८ जून पासून एसटी प्रशासनातर्फे 'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे.  या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.

Web Title: Good news for students! ST bus passenger pass will be available in schools and colleges only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.