ऐतिहासिक! रोहितने गांगुलीची 'दादा'गिरी संपवली; असं करणारा ठरला पहिला भारतीय कर्णधार

Most Wins By An Indian Captain In ICC Events : भारतीय संघाने बुधवारी अमेरिकेला पराभूत करून सुपर-८ चे तिकीट मिळवले.

सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. यंदा या स्पर्धेत २० संघ सहभागी झाले आहेत. भारतीय संघाने बुधवारी अमेरिकेला पराभूत करून सुपर-८ चे तिकीट मिळवले.

या विजयासह रोहित शर्माने भारतीय कर्णधार म्हणून ऐतिहासिक कामगिरी केली. टीम इंडियाने साखळी फेरीतील आपल्या सातव्या सामन्यात अमेरिकेला पराभवाची धूळ चारली. खरे तर आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्यांच्या बाबतीत रोहितने माजी खेळाडू सौरव गांगुलीला मागे टाकले आहे.

भारतासाठी आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत सौरव गांगुली तिसऱ्या स्थानावर आहे. 'क्रिकेटच्या दादा'च्या नेतृत्वात टीम इंडियाने २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि २००३ च्या विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला होता.

गांगुलीने आयसीसी स्पर्धांमध्ये २२ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि १६ सामन्यांत बाजी मारली.

विराट कोहलीनंतर भारतीय संघाची धुरा सांभाळणाऱ्या रोहितने टीम इंडियाला वन डे विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत नेले होते. मात्र, बलाढ्य ऑस्ट्रेलियाने भारताच्या तोंडचा घास पळवून सहाव्यांदा विश्वचषक उंचावला.

रोहित शर्माने आतापर्यंत २० वेळा आयसीसी स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले, त्यात तो १७ सामने जिंकण्यात यशस्वी झाला.

भारताला ट्वेंटी-२० विश्वचषक, आयसीसी ट्रॉफी आणि वन डे विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी या यादीत अव्वल स्थानी आहे. धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे.

धोनीने २००७ पासून भारताचे कर्णधारपद सांभाळले. त्याने त्याच्या कारकिर्दीत आयसीसी स्पर्धांच्या ५८ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि भारताला ४१ सामने जिंकवून दिले.

दरम्यान, भारताचा कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या यादीत धोनी पहिल्या क्रमांकावर आहे, तर रोहित शर्मा आणि सौरव गांगुली अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.