PHOTOS : नेपाळच्या 'युवा' संघाचा झंझावात; आफ्रिकेने तोंडचा घास पळवताच अश्रू अनावर

Nepal vs South Africa : दक्षिण आफ्रिकेने नेपाळचा पराभव करून विजयाचा चौकार लगावला.

ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भल्या भल्या संघांना जे जमले नाही ते नेपाळच्या संघाने करून दाखवले. आफ्रिकेसारख्या संघाची पळता भुई थोडी करून नेपाळने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले.

नेपाळच्या संघात युवा खेळाडूंची फौज आहे. बहुतांश खेळाडूंचे वय ३० पेक्षा कमी आहे. अनुभवाची कमी असली तरी या आशियाई संघाने टॅलेंटची कमी नसल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.

यंदाच्या विश्वचषकात सुपर-८ साठी पात्र ठरणारा दक्षिण आफ्रिका हा पहिला संघ आहे. पण, नेपाळच्या गोलंदाजांनी अवघ्या ११५ धावांत आफ्रिकेला रोखून सामन्यात रंगत आणली.

ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधील ३१ वा सामना दक्षिण आफ्रिका आणि नेपाळ यांच्यात खेळवला गेला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर आफ्रिकेने बाजी मारली.

आफ्रिकेने तोंडचा घास पळवताच नेपाळच्या खेळाडूंसह चाहत्यांना अश्रू अनावर झाले. नेपाळचे शिलेदार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

नेपाळला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी २ धावांची गरज होती. मात्र शेवटचा चेंडू निर्धाव गेला. यष्टीरक्षरक क्विंटन डीकॉकने दुसऱ्या टोकाला चांगला थ्रो करून नेपाळच्या फलंदाजाला धावबाद करण्यात मदत केली अन् सुपर ओव्हर टळली. याशिवाय आफ्रिकेने निसटता विजय मिळवला.

ड गटातील नेपाळने तीनपैकी एक सामना जिंकला आहे. या गटातून दक्षिण आफ्रिका सुपर-८ साठी पात्र ठरली. तसेच बांगलादेश आणि नेदरलँड्स हे संघ सुपर-८ च्या शर्यतीत आहेत.

नेपाळने आफ्रिकेला पराभूत केले असते तर मोठा उलटफेर झाला असता. पण यासाठी आशियाई शिलेदारांना एक धाव कमी पडली.